Rajasthan Assembly Election 2018:  वसुंधरा राजे यांच्याकडून भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; विद्यार्थ्यांना लॅपटॉप, नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचे अश्वासन
वसुंधरा राजे यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. (Photo Credits: Facebook/VasundharaRajeOfficial)

Rajasthan Assembly Election 2018: राजस्थान विधानसभा निवडणुकीला अवघे १० दिवस बाकी असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा प्रसिद्ध करताना वसुंधरा राजे म्हणाल्या, जाहीरनाम्यात दिलेल्या ८० टक्के योजनांचे काम सरकारने आगोदरच पूर्ण केले आहे. दरम्यान, जाहीरनामा प्रसिद्ध झाला तेव्हा केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे इतरही प्रमुख नेते उपस्थित होते.

भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

  • विद्यार्थ्यांना स्कूटी आणि लॅपटॉप मिळणार
  • सात नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार
  • शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीने वाढविण्याचे ध्येय
  • युवकांसाठी बेरोजगार भत्ता. त्यासाठी किमान पाच हजार रुपये
  • राज्यातील सर्व जिल्ह्यांना जोडण्यासाठी ४ प्रमुख लेन हायवे
  • राजस्थानातील सर्व जिल्ह्यांमध्ये योगा केंद्राची उभारणी
  • पाच वर्षांत ५० लाख नोकऱ्या देण्याचे अश्वासन
  • शेतकऱ्यांसाठी २५० कोटी रुपयांचा स्टार्टअप फंड
  • सर्व ग्रामपंचायतींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकांनी जोडणार

(हेही वाचा,वसुंधरा राजेंच्या पोस्टरसमोर भाजप मंत्र्याकडून लघुशंका; टीकेनंतर म्हणाले 'मी तर परंपरा पाळली' )

राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागांसाठी येत्या ७ डिसेंबरला मतदान होत आहे. १० डिसेंबरला मतमोजणी होऊन जनतेचा कौल कोणाला हेही जाहीर होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर देत सत्तेबाहेर ठेवले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचा पाडाव झाला होता. मात्र, या वेळी सामना काट्याचा आहे. सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेसने मोठे आव्हान उभे केले आहे. विविध जनमत चाचण्यांमध्ये राजस्थानमध्ये सत्तांतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, जनतेच्या मनात काय ते थेट १० डिसेंबरलाच कळणार आहे.