राहुल गांधी याचा राजीनामा देण्याचा निश्चय कायम, काँग्रेस अध्यक्ष पदासाठी 'या' मंडळींची नावं चर्चेत
Rahul Gandhi | (Photo Credit : Facebook)

लोकसभा निवडणुकांच्या(Lok Sabha Elections)  निकालामध्ये काँग्रेस (Congress) पक्षाचा दारुण पराभव झाला होता हे अपयश पचवू न शकल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लगेचच आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. यांनतर काँग्रेसच्या कार्यकारणी समितीने हा राजीनामा फेटाळून लावला असला तरी आता राहुल गांधी आपल्या या निर्णयाबाबत अगदीच गंभीर असल्याचे समजत आहेत. तसेच  स्वतः राहुल यांनीच आपली बहीण प्रियांका गांधी (Priyanka Gandhi)  हिला त्या जागी नेमणार अनासल्याचे स्पष्ट केले होते सोबतच सोनिया गांधी (Sonia Gandhi)  यांना देखील तब्येतीच्या कारणावरून राजकारणात सक्रिय सहभाग घेणे शक्य होत नाही त्यामुळे आता जर का दुसरे कोणते नाव नेमून द्यायचे झाले तर ते नेमके कोणाचे असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसमध्ये दोन कार्यकारी अध्यक्ष असावेत या सूचनेला पक्षाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली आहे. काँग्रेसच्या दोन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक दक्षिण भारतातला असेल तर चांगलं होईल, असा प्रस्ताव आला आहे. कार्यकारी अध्यक्ष अनुसूचित जाती-जमातींमधला असावा, असाही एक प्रस्ताव आहे.तर महाराष्ट्रात येत्या काळात विधानसभा निवडणूकांचे सत्र सुरु होणार असल्याने अध्यक्षपदी एखादं मराठी नाव देखील समोर येण्याची शक्यता आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदावर कायम; पक्षाच्या कार्यकारिणी समितीने फेटाळला राजीनामा; देशभरात प्रादेशिक नेतृत्व बदलाचे संकेत

हे असू शकतात अध्यक्ष पदाचे दावेदार

ए. के. अँटोनी, मालिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन पायलट, पृथ्वीराज चव्हाण या मंडळींची काँग्रेस अध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मध्यंतरी राहूल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली असता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु होती, असे झाले असता शरद पवारच काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होऊ शकले असते मात्र त्याचवेळी विलीनीकरणाच्या केवळ अफवा आहेत असे सांगून पवार यांनी या शक्यतेला पूर्णविराम लावला होता.

काँग्रेस पक्ष हा गांधी घराण्याचे वर्चस्व असलेला पक्ष म्हणून ख्यात आहे अशात आता नव्या नावाची नेमणूक केल्यावर घराणेशाही मोडीत काढली जाईल का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगात आहेत.दरम्यान नवीन सरकारचे संसदेचे अधिवेशन सुरु व्हायच्या आधी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार याविषयी अधिकृत घोषणा होऊ शकते .सध्या राहू गांधी हे वायनाड मधील जनतेचे आभार मानण्यासाठी दौऱ्यावर गेले असल्याने तिथून आल्यावरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.