Loksabha Election 2019: नोटबंदी निर्णय योग्यच, नोकरी गेली असे कारण वापरू नका! - नरेंद्र मोदी
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज तक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नोटबंदी (Demonetisation) निर्णयाचे समर्थन करत 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने नोकऱ्या कमी झाल्याचा आरोप खोडून काढला आहे. नोटबंदी मुळे बेरोजगारी वाढली नसून याचा काळा पैसा (Black Money) बाहेर काढण्यासाठी फायदा झाल्याचे मोदींनी सांगितले. 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधानांनी एकाएकी देशातील उपलब्ध चलनां पैकी 86 टक्के नोटा अवैध घोषित केल्याने देशवासियांना मोठा धक्का बसला . नंतर अनेकांनी नोटा बदलून घेण्यासाठी मोठ्या रांगांमध्ये उभं राहावं लागलं, नोकऱ्या कमी झाल्या, बिजनेसचे भाव कोसळले असे आरोप या निर्णयावर केले होते, या सर्व आरोपांना उत्तर देत मोदींनी नोटबंदीचा निर्णय का योग्य आहे याबद्दल मुलाखतीत माहिती दिली.

नोकऱ्या गेल्या असं सांगणाऱ्यांनी तशी आकडेवारी सादर केली नाही, तर केवळ या निर्णयाला विरोध करायचा म्हणून आरोप लावले जातायत, या निर्णयाने येणारे फायदे न बघता नोकऱ्यांचे केवळ कारण काही जण वापरत आहेत,जनतेची मानसिकता बदलण्यास नोटबंदीमुळे मदतच झाली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. नोटबंदी: अरुण जेटली यांना वाटते, 'काळाची गरज'; मनमोहन सिंह म्हणतात, 'काळासोबत खोलवर रुतणारी जखम

या बद्दल अधिक माहिती देताना मोदी सांगतात की, "अनेक भ्रष्ट राजकारणी तसेच व्यापाऱ्यांनी गोण्यांमध्ये, गॅरेजमध्ये,घरात लपवलेल्या काळ्या पैशाचे फोटोग्राफ नोटबंदी नंतर पाहायला मिळाले होते. जवळपास 50,000 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली, तसेच 3 लाख बनावटी कंपनींना टाळे लावण्यात आले. यामुळे काळा पैसा बाळगण्याची धास्ती बसून प्रामाणिक व्यापाराला प्रोत्साहन मिळाले आहे. तसेच कर प्राप्तीचे प्रमाण वाढून आहे. महागाईचे प्रमाण कमी होण्यात नोटबंदीचा देखील काही प्रमाणात वाटा आहे",   Effects Of Demonetisation: नोटबंदी निर्णयाच्या तडाख्यात 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या - अहवाल

नोटबंदीचा हेतू हा निवडणुका नसून उत्तर प्रदेशात जे नेते त्याचा संबंध राजकारणाशी जोडत आहेत त्यांना तिथल्या जनतेने सडेतोड उत्तर दिलं आहे. याविषयावर लोकांनीच आता बोलणं बंद केले आहे, असे मोदींनी नोटबंदीची योग्यता पटवून देताना स्पष्ट केले. मागील वर्षी आरबीआय ने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार नोटबंदीमुळे रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपये किमतीच्या 15.41 लाख कोटी पैकी 15.3 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले होते.