नोटबंदी: अरुण जेटली यांना वाटते, 'काळाची गरज'; मनमोहन सिंह म्हणतात, 'काळासोबत खोलवर रुतणारी जखम'
नोटबंदीच्या निर्णयावरुन केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यात संघर्ष (संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

नोटबंदी नंतरची दोन वर्षे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (8 नोव्हेंबर 2016) नोटबंदीचा धक्कादायक निर्णय घेतला. ज्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. तसेच, हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी देशाने बँकेच्या दारात रांग लावली. देशात असलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि त्याला पायबंद घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सरकार आणि भाजप समर्थक विचारवंतांकडून सांगण्यात येते. तर, काँग्रेस आणि विरोधी पक्षातील मंडळींनी सर्वसामान्यांच्या पैशावर मारलेला डल्ला अशी टीका नोटबंदीवर केली. नोटबंदीच्या फायद्या तोट्याबाबत आजही चर्चेच्या फैरी जोरदार झडत असतात. दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयाची आठवण काढताना आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला. आपापल्या पद्धतीने नोटबंदीचे विश्लेषण मांडले आहे.

अरुण जेटली काय म्हणाले ?

नोटबंदीच्या निर्णयाचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याकडून जोरदार समर्थन करण्यात आले आहे. अरुण जेटली म्हणतात 'आज नोटबंदीच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली. नोटबंदीचा निर्णय हा विद्यमान सरकारकडून घेतलेला सर्वात महत्त्वाचा आणि योग्य निर्णय होता. हे दोन वर्षांच्या कालावधीत स्पष्ट झाले', असा दावा जेटली यांनी केला. तसेच, 'नोटबंदी ही काळाची गरज होती. नोटबंदीमुळे विदेशातील काळा पैसा बाहेर आला. जे लोक करचुकवेगिरी करत होते त्यांना चाप लागला. नोटबंदीमुळे करभरणा करणाऱ्या मंडळींमध्येही वाढ झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत 2018/19मध्ये करभरणा सुमारे 19.5 टक्क्यांनी वाढला आहे', असाही दावा जेटली यांनी केला आहे. (हेही वाचा, कर्जबुडव्यांना लगाम, एकाच क्लिकवर कर्जदाराची कुंडली; 'आरबीआय'चे डिजिटल पाऊल)

मनमोहन सिंह काय म्हणाले ?

दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मात्र नोटबंदीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दोन वर्षाच्या काळात नोटबीदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देणारा निर्णय होता. या निर्णयाचे वाईट परिणाम काळासोबत अधिक खोल होत जातील. या निर्णयाचा परिणाम देशातील प्रत्येक व्यक्तिवर झाला. सरकारने यापूढे असे निर्णय घेताना अधिक काळजीपूर्वक विचार करायला हवा होता. जेणकरून अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण होईल, असा हल्ला मनमोहन सिंह यांनी केला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारडून अत्यंत अविचारीपणे घेतलेला निर्णय म्हणजे नोटबंदी. कोणताही पूर्वविचार न करतान केंद्र सरकारने 2016मध्ये नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे वाईट परिणाम आता पुढे येत आहेत, अशी घनाघाती टीकाही मनमोहनसिंह यांनी केंद्र सरकारवर केली आहे.