भारतामध्ये आज मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telangana) आणि छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर केले जात आहेत. यामध्ये तीन राज्यांच्या सीमा महाराष्ट्राशी जोडल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्राचेही या विधानसभा निवडणूक निकालांकडे लक्ष लागले आहे. त्यापैकी एक असलेल्या मध्य प्रदेशात भाजपा ने विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशातील इंदौर (Indore) हा मराठमोळा प्रांत आहे. या भागातील 9 विधानसभा जागा आहे. आणि त्यापैकी 8 जागांवर भाजपा आघाडी वर आहे. देशातील या विधानसभा निवडणूक निकालांकडे आगामी लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिलं जात असताना कोणत्या मतदारांचा कल कुठे आहे? याकडेही पक्षांचे आणि राजकीय अभ्यासकांचे लक्ष असणार आहे. इंदौर या मराठमोळ्या भागात नागरिकांनी भाजपाला साथ दिली आहे.
मध्य प्रदेशात भाजपाच्या विजयामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची 'लाडली बहना' योजना गेमचेंजर ठरल्याचं पहायला मिळालं आहे. या निवडणूकीत 77% महिला मतदारांनी मतदान केले होते. त्यामुळे चौहान यांच्या पाठीशी मोठी स्त्री शक्ती उभी राहिल्याचं चित्र आहे. MP Election Results 2023 LIVE Streaming: मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2023 येथे पाहा ABP न्यूज लाइव्ह स्ट्रीमिंग द्वारे .
इंदौर मधील 9 जागांवर कोण आघाडीवर?
इंदौर विधानसभा 1 मध्ये कैलाश विजयवर्गीय , इंदौर विधानसभा 2 मध्ये रमेश मेंदोला, इंदौर विधानसभा 3 मध्ये गोलू शुक्ला, इंदौर विधानसभा 4 मध्ये मालिनी गौड़, इंदौर विधानसभा 5 मध्ये महेंद्र हार्डिया, राऊ विधानसभा मतदारसंघामध्ये मधु वर्मा, महू विधानसभा मतदारसंघामध्ये ऊषा ठाकुर, सांवेर विधानसभा मतदारसंघामध्ये तुलसी सिलावट, देपालपुर विधानसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे विशाल पटेल पुढे होते. त्यांच्यासमोर भाजपा च्या मनोज पटेल यांचे आव्हान आहे.
मध्य प्रदेशात कॉंग्रेसला सत्ता बदल घडवून आणण्यासाठी मेहनत सुरू होती पण पुन्हा मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आली आहे. या विजयावर ज्योतिरादित्य सिंधिया सह भाजपाच्या मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे. तर आता कॉंग्रेस कडून या निवडणूक निकालांवर विचारमंथन करण्यासाठी 6 डिसेंबरला 'इंडिया'च्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.