गुजरात: हार्दिक पटेल यांना कानशिलात लगावलेल्या व्यक्तीकडून हल्ल्याचे स्पष्टीकरण
Man who slapped Hardik Patel at a rally in Gujarat (Photo Credits: ANI)

गुजरात (Gujarat) मधील सुरेंद्र नगर (Surendranagar) येथे प्रचारसभा सुरु असताना चक्क मंचावर येत एका व्यक्तीने काँग्रेस नेते (Congress Leader) हार्दिक पटेल (Hardik Patel) यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर प्रचारसभेत एकच गोंधळ उडाला. तेथे उपस्थित हार्दिक पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. आता मात्र या व्यक्तीने हार्दिक पटेल यांना का मारलं, याचं कारण स्पष्ट केलं आहे. गुजरात: भरसभेत काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली (Watch Video)

या व्यक्तीने सांगितले की, "पाटीदार आरक्षण आंदोलन सुरु असतानाच्या काळात माझी पत्नी प्रेग्नेंट होती. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आंदोलनामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला. अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तेव्हाच मी ठरवले की, मी या व्यक्तीला मारणार. मी याला धडा शिकवणार." तरुण गज्जर असे या हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या रागातून या व्यक्तीने आज हे गंभीर पाऊल उचलले.

त्यानंतर अहमदाबाद येथे हार्दिक पटेल यांची रॅली सुरु असताना मी माझ्या बाळासाठी औषधे आणण्यासाठी गेलो असता सर्व मेडिकल स्टोर्स बंद होते. हार्दिक याने सर्व रस्ते देखील बंद केले होते. त्याच्या मनाप्रमाणे गुजरात बंद करणारा तो कोण आहे? तो काय गुजरातचा हिटलर आहे का? असा सवाल या हल्ला करणाऱ्या व्यक्तीने उपस्थित केला आहे.

ANI ट्विट:

हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांकडून या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ANI ट्विट:

मात्र हल्ला झाल्यानंतर भाजपने हा हल्ला घडवून आणल्याचे आणि मला मारण्याचा भाजपाचा डाव असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले होते.