Madhya Pradesh Assembly Elections 2018: एकूण २२७ जागांसाठी मतदान सुरु; मतदार ठरवणार मध्य प्रदेशचे भविष्य
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक (Photo Credits: Twitter @ANI)

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक (Madhya Pradesh Assembly Elections 2018) प्रचाराची रणधुमाळी संपल्यावर आज (बुधवार, 28 नोव्हेंबर) प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. सकाळी 8 वाजलेपासून सुरु झालेली ही मतदान प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील नक्षलप्रभावित परिसरात सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान दुपारी 3 पर्यंत सुरु असेल. विधानसभेच्या एकूण 227 जागांसाठी हे मतदान होत आहे. गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. तर, दुसऱ्या बाजूला गेली 15 वर्षे सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसचा सत्तेत पुनरागमन करण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या सत्तासंघर्षात नेमकं कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, सर्वच्या सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत असल्यामुळे निवडणूक व्यवस्थापन, प्रशासनावरही मोठा ताण आहे.

मध्यप्रदेश विधानसभेसाठी एकूण मतदारसंख्या 5,04,95,251 इतकी आहे. त्यापैकी 2,63,01,300 पुरुष, 2,41,30,390 महिला मतदार आहेत. तर, 1,389 थर्ड जेंडर मदतार आहेत. एकूण मतदारांपैकी निवडणूक प्रक्रियेसाठी कर्तव्यवावर असलेल्या 65,000 मतदारांनी पोस्टाद्वारे मतदान केले आहे. उर्वरीत 5,04,33,079 मतदार मतदानाचा हक्क आज बजावत आहेत. या निवडणुकीसाठी 1,094 अपक्ष उमेदवारांसह एकूण 2,899 उमेदवार मैदानात आहेत. ज्यात 2,644 पुरूष, 250 महिला तर ५ ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश आहे. (हेही वाचा, राजस्थान विधानसभा निवडणूक: राहुल गांधींनी सांगितले गोत्र; नरेंद्र मोदींकडून जातीचा खुलासा; प्रचारातून विकासाचा मुद्दा गायब)

सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यात यंत्रणा कार्यन्वीत केली आहे. राज्यात एकूण 65,367 मतदान केंद्रं आहेत. त्यापैकी 17,000 मतदान केंद्रं संवेदनशिल म्हणून घोषित केली आहेत. कोणताही अनुचीत प्रकार टाळण्यासाठी तब्बल 1.80 लाख पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.