यंदा भाजपवर संक्रांत? पंतप्रधान मोदींच्या विजयात हत्ती, सायकल घालणार खोडा?
Pm Narendra Modi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या प्रतिमेचा वापर करत 2014 प्रमाणे यंदाही लोकसभा, विधानसभा निवडणुका खिशात टाकायच्या असा भाजप आणि धुरीणांचा होरा. पण, राजकीय विश्लेषक व्यक्त करत असलेले अंदाज काहीसे वेगलेच आहेत. यंदाची निवडणूक पंतप्रधान मोदी आणि भाजपसाठी वाटते तितकी सोपी नाही. राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांत भाजपचा पराभव झाल्यानंतर देशातील राजकीय समिकरणे प्रचंड बदलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनतेचा सूर तीव्र होत चालल्याचे अनेक राजकीय पंडीतांचे मानने आहे. त्यातच देशाला सर्वाधिक खासदार देणारं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh). या उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव (Akhilesh Yadav) याचा समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष ( BSP) यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही भाजपला विजयाचा रथ ओढणे कठीण दिसते. त्यामुळे यंदा भाजपच्या विजयावर संक्रात येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला यंदाची निवडणूक कठीण जाणार असा दावा केला जातो. याची काही कारणे आहेत. राजकीय अभ्यासकांच्या मते लोकसभा निवडणुकीत भाजप किमान 90 जागांवर पराभूत होईल. त्यामुळे लोकसभेत 272 हा बहुमताचा जादूई आकडा गाठणे भाजपला जड जाईल. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये 2014च्या मतदान आकडेवारीचा आधार घेतला तर, चित्र भाजप विरोधी दिसते. आकडेवारीनुसार सपा-बसपा यांच्या आघाडीने 2014 इतके जरी मतदान मिळवले तरी, या दोन्ही पक्षांना मिळून 41 जागांवर विजय मिळू शकतो. ही शक्यता वास्तवात आली तर, उत्तर प्रदेश मध्येच भाजपला मोठा फटका बसू शकतो. (हेही वाचा, मोदी सरकारला शिवसेनेचा धक्का; राफेल प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करण्याची खा. अरविंद सावंत यांची मागणी)

दुसऱ्या बाजूला कर्नाटक, आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही अनेक ठिकाणी सत्ताधारी असतानाही भाजपचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रातही भाजपची शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही तर, त्याची मोठी किंमत भाजपला चुकवावी लागेल. त्यामुळे 2014 मध्ये विजयी झालेल्या पण आता पराभवाच्या छायेत असलेल्या अनेक जागा भाजपसाठी धोक्याची घंटा ठरु शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. अर्थात, 2014 पेक्षा मोठा विजय 2019मध्ये जतना आपल्याला मिळवून देईल असा विश्वास भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. हा विश्वास किती सार्थ ठरतो यासाठी प्रत्यक्ष निवडणूक निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे हे नक्की.