लोकसभा निवडणूक निकाल (Lok Sabha Election Result) आता हाती येण्यास सुरूवात झाली आहे. भाजपाचं 'अबकी बार 400 पार' चं स्वप्न भंगलं आहे. तर 543 जागांपैकी 542 जागांच्या निकालांमध्ये भाजपा 236 जागांवर आघाडी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे बहुमताचा 272 आकडा एनडीए ला जमा करताना इतर पक्षांची मदत घेण्याची गरज पडू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान 18व्या लोकसभेसाठी सरकार बनवताना पंतप्रधान पदाच्या खूर्चीवर कोण बसू शकतं याचे अंदाज आता समोर येत आहेत. यामध्ये आघाडीच्या नावांमध्ये नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा आहे.
नितीन गडकरी हे भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचे सर्वपक्षीय संबंध चांगले असल्याने आणि मंत्री म्हणून त्यांची कामगिरी जनमाणसांमध्येही लोकप्रिय आहे. दरम्यान नितीन गडकरी हे भाजपा पक्षाचे उमेदवार असूनही महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळू शकतो. राज्यात आणि केंद्रात त्यांची अजातशत्रू प्रतिमा त्यांना या काळात पंतप्रधान पदापर्यंत घेऊन जाण्यास मदत करू शकते. दरम्यान मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए मध्ये येऊ शकतात अशा चर्चा रंगल्या आहेत.
राजनाथ सिंग हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधील दुसरे महत्त्वाचे दावेदार आहेत. सध्या राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्री पद आहे. अखिलेश यादव राजनाथ यांच्या मागे उभी राहण्याची शक्यता आहे.
योगी आदित्यनाथ यांचा देखील उत्तर प्रदेशामध्ये करिष्मा आहे. त्यांच्याकडे देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र भाजपा देऊ शकण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रामध्ये, बिहार मध्ये एनडीए ला मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रातही 45 पार चा नारा दिलेल्या एनडीएला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याचं चित्र आहे.