लोकसभा निवडणूक 2019: माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर पुण्यातून मैदानात? निष्ठावंतांचे काय होणार?
माधुरी दीक्षित हिला लोसभेसाठी पुण्यातू भाजपची उमेदवारी? | (Photo Credits: Archived, edited, representative images)

Lok Sabha Election 2019: धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचे चाहते आणि पुणे भाजपतील कार्यकर्ते यांच्यासाठी काहीशी आनंदाची तर बऱ्याच अंशी धक्कादायक बातमी आहे. भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) माधुरी दीक्षित हिला आगामी लोकसभा निवडणुकित पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी देणार असल्याचे वृत्त आहे. माधुरीसाठी भाजपने मतदारसंघही योजून ठेवला असून, तिला पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha Constituency) मैदानात उतरवणार असल्याचे समजते. बॉलिवुडमधील सेलिब्रेटी मंडळींची राजकारणात एण्ट्री जनतेला नवी नाही. संबंधीत व्यक्तीचे काम असो नसो अनेक राजकीय पक्षांनी सेलिब्रेटी मंडळींना त्यांचे वलय इनकॅश करण्यासाठी मैदानात उतरवले आहे. त्यामुळे माधुरीही निवडणुकिच्या रिंगणात उतरल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्षे राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून नारायण गणेश गोरे (प्रजा समाजवादी पक्ष), एस.एम. जोशी (संयुक्‍त समाजवादी पक्ष), मोहन एम. धारीया(जनता पक्ष), अण्णा जोशी (भारतीय जनता पक्ष), प्रदीप रावत (भारतीय जनता पक्ष), अनिल शिरोळे (भारतीय जनता पक्ष) या नावांचा उल्लेख वगळता हा मतदारसंघ नेहमी काँग्रेसच्याच बाजूने राहिला आहे. सुरेश कलमाडी हे या मतदारसंघातील काँग्रेसचे अलिकडच्या काळातील शेवटचे खासदार. कॉमन वेल्थ स्पर्धेतला घोटाळा भोवल्याने काँग्रेसने कलमाडी यांना 2014च्या लोकसभा निवडणुकीत तिकिट नाकारले. त्याऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना तिकीट दिले. मात्र, 2014मध्ये काँग्रेस विरोधी लाटेत कदम यांचा पराभव झाला. पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे अनिल शिरोळे विजयी झाले.

दरम्यान, 2014मध्ये काँग्रेस विरोधी लाटेत जनतेने भाजपला साथ दिली आणि भाजप सत्तेवर आला. विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार 2019साठी विद्यमान स्थिती भाजपला अनुकुल नाही. त्यामुळे आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजप नेतृत्वाने काही महिने आगोदरच तयारी सुरु केली आहे. दुसऱ्या बाजूला 2019 साठी विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये पुणे मतदारसंगातून चुरस पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र, पवारांनी या वृत्ताचे खंडण करत या चर्चेला पूर्णविराम दिला. पुणे हा सर्वच राजकीय पक्षांसाठी एक महत्त्वाचा मतदारसंघ ठरला आहे. या पार्श्वभूमिवर विरोधकांना टक्कर द्यायची तर जनतेला परिचीत आणि गर्दी इनकॅश करणारा तसेच पाटी कोरी असलेला उमेदवार हवा. या विचारातूनच भाजपा 2019 लोकसभा निवडणुकीत सेलिब्रेटींनी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी भाजपाकडून देशव्यापी सर्वेक्षणही करण्यात आलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा माधुरी दीक्षितला तिकीट देणार असल्याचं बोललं जात आहे. (हेही वाचा, रद पवार लोकसभेच्या रिंगणात? पुणेरी पगडी नाकारलेल्या पुण्यातूनच नवी सुरुवात?)

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितची तिच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्या वेळी ही भेट आणी चर्चेचा तपशील बाहेर आला नव्हता. पण, माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर आता तिला लोकसभेचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, काँग्रेसच्या हाताला राष्ट्रवादीचे घड्याळ? )

पुणे मतदारसंघातून लोकसभेवर गेलेले खासदार

पहिली लोकसभा १९५२-५७ नरहर विष्णु गाडगीळ (पुणे मध्य) इंदिरा ए. मायदेव (पुणे दक्षिण) काँग्रेस

दुसरी लोकसभा १९५७-६२ नारायण गणेश गोरे प्रजा समाजवादी पक्ष

तिसरी लोकसभा १९६२-६७ शंकरराव शांताराम मोरे काँग्रेस

चौथी लोकसभा १९६७-७१ एस.एम. जोशी संयुक्‍त समाजवादी पक्ष

पाचवी लोकसभा १९७१-७७ मोहन एम. धारीया काँग्रेस

सहावी लोकसभा १९७७-८० मोहन एम. धारीया जनता पक्ष

सातवी लोकसभा १९८०-८४ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)

आठवी लोकसभा १९८४-८९ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)

नववी लोकसभा १९८९-९१ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)

दहावी लोकसभा १९९१-९६ अण्णा जोशी भारतीय जनता पक्ष

अकरावी लोकसभा १९९६-९८ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बारावी लोकसभा १९९८-९९ विठ्ठल तुपे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रदीप रावत भारतीय जनता पक्ष

चौदावी लोकसभा २००४-२००९ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सोळावी लोकसभा २०१४- अनिल शिरोळे भारतीय जनता पक्ष

निष्ठावान कार्यकर्त्यांचे काय होणार?

दरम्यान, आयारामांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना थेट निवडणुकीचेच तिकीट देणे हे भाजपसाठी नवे नाही. पण, त्यामुळे निष्ठावांत कार्यकर्त्यांचे काय होणार असा सवाल उपस्थित होतो आहे. तसेच, पुण्यातील भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीचे 2019मध्ये काय होणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार अनिल काकडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे. माधुरी दीक्षित कडून मात्र या चर्चेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.