राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (संग्रहित छायाचित्र) (Photo credits: shrad_pawar/facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार पवार हे लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार करत असून, या वेळी ते पुण्यातून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणाची नस माहिती असलेले आणि भारतीय राजकारणात पंतप्रधान पदाच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक म्हणून नेहमीच ओळखले जाणारे नेते म्हणून शरद पवार यांची ख्याती आहे.

दरम्यान, आघाडीच्या जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. २००९ मध्येही हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. आणि त्या वेळी सुरेश कलमाडी यांनी हा गड राखलाही होता. मात्र, कॉमनवेल्थ भ्रष्टाचारात कलमाडी यांचे नाव आले. त्यामुळे २०१४ मध्ये काँग्रेसतर्फे काँग्रेसचे नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांनी पुण्याचा गड लढवला. पण, त्यांना भाजपच्या अनिल शिरोळे यांचेकडून पराभव स्वीकारावा लागला. कदम हे सध्या कडेगाव-पलूसमधून आमदार आहेत. त्यामुळे भाजपविरोधात हा गड पुन्हा एकदा खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीने कांग्रेसकडे या मतदारसंगाची मागणी केल्याचे समजते.

दरम्यान, २०१९मध्ये लोकसभेत बहुमता अभावी त्रिशंखू स्थिती निर्माण झाली तर, सर्वपक्षीय आघाडी (खास करुन प्रादेशिक) करण्यासाठी पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ही कामगिरी करायची तर, राज्यसभेपेक्षा लोकसभा केव्हाही फायद्याची. त्यामुळेच पवार यांनी ही रणनिती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अर्थात, बारामती हा पवार यांचा हक्काचा मतदारसंघ. बारामतीतूनच पवार यांच्या राजकीय नेतृत्वाने राजकारणाची सुरुवात केली आणि पुढे राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घेतली. मात्र, २००९ पासून, पवारकन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात.