केंद्र सरकार कडून आज 'one nation, one election' साठी रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. माजी राष्ट्रपतींकडे याची जबाबदारी देण्यात आली असून ते अहवाल सादर करणार आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार कडून संसदेचं विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात आले आहे. 18-22 सप्टेंबर या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आल्याने आता चर्चा रंगू लागल्या आहेत. या अधिवेशनात ' वन नेशन वन इलेक्शन' वर चर्चा होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे.
केंद्रातील सर्व खात्यातील सचिवांना सध्या पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगी शिवाय दिल्ली न सोडण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या विशेष अधिवेशनामध्ये याबाबतचं विधेयक येऊ शकते असा अंदाज आहे.
भारतामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा या प्रस्तावाचा संदर्भ आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रसंगी या विषयावर बोलले आहे आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्याचा हा एक भाग देखिल होता. भारतात 1967 पर्यंत एकाच वेळी निवडणुका घेणे हा नियम होता आणि अशा प्रकारे चार निवडणुका झाल्या. 1968-69 मध्ये काही राज्यांच्या विधानसभा वेळेपूर्वी विसर्जित झाल्यानंतर ही प्रथा बंद झाली. लोकसभा देखील प्रथमच वेळापत्रकाच्या एक वर्ष अगोदर विसर्जित करण्यात आली आणि 1971 मध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या.