कामगार नेते, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन
George Fernandes Dies (Photo Credits: Getty)

George Fernandes Passes Away: भारताचे माजी संरक्षणमंत्री (Former Defence Minister)  जॉर्ज फर्नांडीस (George Fernandes) यांचे आज (मंगळवार, 29 जानेवारी) निधन झाले आहे.  वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  प्रदीर्घ काळापासून ते अल्जायमर या आजाराने त्रस्त होते. दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी त्यांचे निधन झाले.. नुकताच त्यांना स्वाई फ्लू झाला होता.  1967 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले होते. ऑगस्ट 2009 ते जुलै 2010 हा त्यांच्या संसदीय राजकारणाचा शेवटचा काळ होता. त्यानंतर ते परत कधीच संसद सभागृहात दिसले नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. आयुष्यभर कामगार नेते राहिलेल्या फर्नांडीस यांच्यावर ते संरक्षणमंत्री असताना जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. आयुष्यभर साधी राहणी जगलेल्या फर्नांडीस यांच्यावर असा आरोप होणे हे त्यांच्या एकूण राजकारणाला हादरवून टाकणारे होते.  पुढे या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत न्ययालयानेच हे प्रकरण निकालात काढले. फर्नांडीस आरोपमुक्त झाले.

जॉर्ज फर्नांडीस हे एक लढवय्या व्यक्तीमत्व होते. मुळचे मुंबईचे नसतानाही ते मुंबईत आले. मुंबईतील कामगार आणि कामगार चळवळीत त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले. खास करुन रेल्वे कर्माचारी आणि इतर कामगार संघटनांमध्येही ते सक्रीय राहिले. त्यांच्या कामगार चळवळ नेतृत्वाखाली त्यांनी केलेले रेल्वे कर्मचारी संप विशेष गाजले. त्यामुळेच त्यांना दीड मिनिटांत मुंबई थांबवणारा माणूस अशी त्यांची ओळख बनली.

इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या अणिबाणीला जॉर्ज फर्नांडीस यांनी जोरदार विरोध केला. त्यासाठी त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले. अणिबाणीनंतरची लोकसभा निवडणूक त्यांनी तुरुंगातूनच लढली. या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी त्यांच्या हातात बेड्या घातलेले छायाचित्र लोकांना भावले. फर्नांडीस यांचा विजय झाला. या निवडणूकीत त्या काळी काँग्रेसचे बडे प्रस्त असलेल्या स.का. पाटील यांचा जॉर्ज फर्नांडीस यांनी पराभव केला.