Droupadi Murmu Vs Yashwant Sinha: राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज; 11 वाजता सुरू होणार मतमोजणी
Yashwant Sinha and Droupadi Murmu. (Photo Credits: ANI)

President Election 2022 Result:  रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्यानंतर नव्या राष्ट्रपतीसाठी 18 जुलैला देशभरात झालेल्या निवडणूकीचा आज निकाल स्पष्ट होणार आहे. या रणधुमाळीमध्ये एनडीए कडून द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) तर युपीए कडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) निवडणूकीच्या रिंगणात होते. खासदार आणि आमदार यांच्या मतदानातून राष्ट्रपती निवडला जात  असल्याने  द्रौपदी मुर्मू यांचा विजय पक्का आहे. 11 वाजता या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू होणार आहे. संसद भवनामध्ये ही मतमोजणी केली जाते.  महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने  राष्ट्रपती निवडणूकीमध्ये अजून काही आमदार फूटणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या मतमोजणीनंतर त्या दाव्यातही किती तथ्य होतं याचा खुलासा होऊ शकणार आहे. Presidential Election Results 2022 Live Streaming: राष्ट्रपती पद निवडणूक मतमोजणी इथे पहा लाईव्ह .

द्रौपदी मुर्मू  या प्रतिभा पाटील यांच्यानंतर राष्ट्रपती पदी विराजमान होणार्‍या पहिल्या महिला आहे. त्या आदिवासी समाजाचं नेतृत्त्व करतात. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका तळागाळातल्या समाजातील व्यक्ती देशातील सर्वोच्च स्थानी विराजमान होणार आहे.  द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा आहे तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा आहे. त्यामुळे मुर्मूंचा विजय पक्का असल्याचं मानलं जात आहे.

भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन खासदार आणि बसपा, काँग्रेस, सपा व एआयएमआयएमचे प्रत्येकी एक खासदार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केलेले नाही. दरम्यान प्रत्येक राज्यागणिक मताचे मूल्य बदलत असल्याने आता मुर्मुंना किती मतं मिळणार याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. खासदारांनी संसदेमध्ये मतदान केले आहे आणि आमदारांनी प्रत्येक राज्याच्या विधिमंडळात मतदान केले आहे. या मतदानानंतर मतपेट्या पुन्हा दिल्लीत आणल्या गेल्या आहेत आणि आज संसदेत सार्‍या मतांची मतमोजणी केली जाणार आहे.

देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे. त्यानंतर 25 जुलै दिवशी नवे राष्ट्रपती शपथ घेणार आहेत.