महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीकडे जनतेचे लक्ष
Sonia Gandhi, Sharad Pawar (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना- राष्ट्रवादी महाआघाडीकडून वेगाने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. तर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. त्यामुळे सर्व जनतेचे लक्ष या बैठकीवर लागले असून सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षाच्या बैठकीनंतर नव्या सरकारबाबत निर्णय सुनावला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या तीन पक्षांच्या बैठका पार पडत आहेत. तर आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांची आज बैठक पार पडणार असून सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याचसोबत तीन पक्षामध्ये सत्ता स्थापनेबाबत खातेवाटपाबाबत एक ड्राफ्ट सुद्धा तयार करण्यात आला आहे. यावर सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. त्यामुळे आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापनेचा विचार करत आहे.(हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु; नागरिकत्व सुधारणा सहित 50 प्रलंबित विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता)

शिवसेनेने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असणार असे आधीच घोषित केले आहे. तर शरद पवार यांनी यावर त्यांची काय भुमिका असणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. तसेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राज्यात असतील असा सत्ता स्थापनेबाबतचा एक फॉर्म्युला समोर आला आहे.