विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना होत आला असला तरीही सत्ता स्थापनेची रणधुमाळी काही संपण्याचे नाव घेत नाहीय. शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांमधील राजकीय तूतू-मैंमैं आता जनताही मजा घेऊन पाहताना दिसत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळत आहे, ज्या बातमीने राजकारणातील सत्तास्थापनेचे चित्रच बदलण्याची शक्यता आहे. NDTV ने दिलेल्या रिपोर्टनुसार, शिवसेनेला मागे टाकण्यासाठी भाजप पक्ष एक नवा डाव खेळण्याची शक्यता आहे. ज्यात भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपद देण्याची ऑफर केली आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
ही बातमी सर्वांना आश्चर्यचकित आणि धक्का देणारी असली तरीही याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. किंबहुना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपला (BJP) समर्थन देण्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेदेखील वाचा- शिवसेनेशी दुरावा; आता मनसे सोबत करणार का भाजप युती? काय होणार नाशकात?
जर राष्ट्रवादीने भाजपला समर्थन दिले तर अगदी सहजपणे ते सरकार स्थापन करतील असे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेना वारंवार असा दावा करत आहे की, ते काँग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार बनविण्याविषयी आग्रही असून त्यावर काम सुरु आहे. मात्र शरद पवारांकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून त्यांचे शिवसेनेवर अनेक टिकास्त्र सोडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे जनताही संभ्रमात पडली आहे की सत्तास्थापनेचे नेमके काय होणार.
तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात शिवसेनाच सरकार बनवेल.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 1-2 दिवसांत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वपुर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. ज्यात कदाचित राज्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा मिळू शकते.