भाजपची नवी रणनिती, देशभरात 50 वर्षांखालील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष पदाची संधी
BJP | Image only representative purpose (Photo credit: File Image)

भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) देशाच्या राजकारणात नवी रणनिती आखताना दिसत आहे. या रणनितीनुसार देशभरातील जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने वयवर्षे 50 किंवा त्याहून कमी असलेल्या कार्यकर्त्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशभरातील अनेक ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष (BJP District President) हे 50 वर्षांहून कमी वयाचे नेमण्यात आले आहेत. पक्षात तरुण नेतृत्व तयार करण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे समजते.

भाजपने काही राज्यांमध्ये तर प्रदेशाध्यक्ष पदासाठीही ही रणनिती अवलंबली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचा हवाला देत आयएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आजच्या काळात पक्षाला तरुण चेहऱ्यांची तरुण रक्ताची गरज आहे. त्यामुळे पक्षाने तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आजचे राजकारण हे अर्धवेळ करण्याची गोष्ट नसून ती पूर्णवेळ करण्याची आवश्यकता आहे. नव्या चेहऱ्यांना आणि तरुणांना वरच्या पदावर मोठ्या प्रमाणावर संधी दिली तर स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांना संधी देता येते. जर कोणी 40 व्या वर्षीच जर जिल्हाध्यक्ष झाला तर त्याच्याकडे पुढे पक्षाचे कार्य करण्यासाठी बराच वेळ आणि काळही राहतो.

भाजप नेत्याने आयएनएस वृत्तसेस्थेशी बोलतना पुढे असेही म्हटले की, पक्षाने जाणीवपूर्वक जिल्हाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या व्यक्तिसाठी वय वर्ष 50 पेक्षा कमी ही अट ठेवली आहे. अर्थात काही ठिकाणी अपवाद घडू शकतो. मात्र जवळास सर्वच ठिकाणी भाजपने 50 वर्षांपेक्षा कमी वयाचा जिल्हाध्यक्ष नेमला आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र भाजप ची नवी कार्यकारिणी जाहीर; विधानसभेत आशिष शेलार मुख्य प्रतोद)

सूत्रांच्या हवाल्याने आयएनएसने म्हटले आहे की, पक्षाने काही दिसांपूर्वीच निर्णय घेतला आहे की, जिल्हाध्यक्ष पदासाठी वय वर्षे 50 पेक्षा कमी आणि तालुकाध्यक्ष पदासाठी 40 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या कार्यकर्त्यालाच संधी दिली जाईल. देशभरात भाजपचे 907 संघटनात्मक जिल्हे आहेत. पक्ष नेतृत्वाने या ठिकाणी 50 वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. तर देशभरातील सुमारे 13,796 तालुकाध्यक्ष पदावर वय वर्षे 40 पेक्षा कमी वयाच्या कार्यकर्त्याला सधी दिली आहे.