Bihar Poll Dates: केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; बिहार विधानसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता
Election Commission of India (PC - Twitter)

आज दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 12.30 च्या सुमारास केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी आगामी निवडणूकांची माहिती देणार आहेत. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये बिहारच्या विधानसभा निवडणूका (Bihar Election), मध्य प्रदेशातील पोटनिवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपत आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागांवर निवडणूका होणार आहे.

भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. अशामध्येच आता निवडणूक प्रक्रिया सुरक्षितपणे कशी पार पाडणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाकडून त्याबाबत कोणती माहिती दिली जाईल हे पाहणं देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. बिहार मध्ये सध्या मुख्यमंत्री नितिश कुमार यांचे भाजपाच्या पाठिंब्याने  सरकार आहे. 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकींमध्ये  RJD ला 80, JDU ला 71 आणि कॉंग्रेसला 27 जागा मिळाल्या होत्या.

ANI Tweet 

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण यंदाच्या निवडणूकीमध्ये चांगलेच गाजत आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेली स्वेच्च्छानिवृत्ती यावरून ते देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्रातही बिहार निवडणूकीबाबत विशेष उत्सुकता आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपाकडून बिहार निवडणूकीची जबाबदारी आहे. तर वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी समा विचारी पक्षांसोबत युती करत बिहार विधानसभा निवडणूका लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

भारतामध्ये बिहार विधानसभा निवडणूकांच्या बरोबरीनेच देशात विविध राज्यांच्या विधानसभेच्या 64 जागांच्या पोटनिवडणुका देखील जाहीर होणार आहेत. त्यांच्या तारखांबद्दलही माहिती मिळू शकते का? याकडे लोकांचं लक्ष आहे.