Bihar Assembly Election 2020: 'आता खूप उशीर झालाय', काँग्रेस नेत्याकडून राहुल गांधी यांच्यासमोर खदखद व्यक्त
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Assembly Election 2020) अचारसंहिता लागून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषीत व्हायला अद्याप बराच कालावधी बाकी आहे. तोपर्यंत विविध राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम आखून नियोजनही सुरु केले आहे. काँग्रेस (Congress) पक्षनेही त्या दृष्टीने हालचाल सुरु केली आहे. मात्र, काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीसाठी खूप उशीर झालाय, असे वाटते आहे. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच बिहार काँग्रेस कार्यकर्त्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. या बैठकीत अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करुन भावाना बोलून दाखवल्याचे समजते.

राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची एक व्हर्च्युअल मिटींग घेतली. यात बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि मित्रपक्षांचा जागावाटपाचे सूत्र लवकरच जाहीर होईल असे सांगितले. तसेच, काँग्रेस नेत्यांनी मित्रपक्षांना अपमानीत वाटेल अथवा ते दुखावले जातील असे वर्तन कटाक्षाने टाळण्याच्याही सूचना दिल्या. या वेळी राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र लवकरच जाहीर- राहुल गांधी)

राहुल गांधी यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करताना काही नेत्यांनी सांगितले की, बिहार विधानसभा निवडणूक अद्याप दूर आहे. मात्र, पक्ष संघटना आणि निवडणुकीची तयारी यासाठी आता फार उशीर झाला आहे. पक्ष सूत्रांच्या हवाल्याने आयएनएस या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

राहुल गांधी यांच्यासोबतच्या व्हर्च्युअल बैठकीला बिहार काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटले की, काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एप्रिल किंवा मे 2019 पासूनच तयारी सुरु करायला हवी होती. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या कामाला सुरुवात करायला हवी होती. अधिक फायदा झाला असता. अन्वर यांच्या प्रतिक्रियेला अनेक नेत्यांनी सहमती दर्शवल्याचे समजते.