Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र लवकरच जाहीर- राहुल गांधी
Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) काँग्रेस पक्ष (Congress Party) माजी अध्यक्ष आणि वायनाड येथील खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता आहे. बिहारमधील काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडून तसे अप्रत्यक्ष संकेत मिळाले. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला (Seat Sharing Formula ) जाहीर करेन असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या व्हर्च्युअल बैठकीस 1000 पेक्षाही अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे झालेल्या बैठकीवेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, कोरोना व्हायरस संकटामुळे नागरिकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. देशात अनेकांचे रोजगार गेले आहेत बेरोजगारी वाढली आहे. अशा स्थितीत काँग्रेस पक्ष आणि कार्यर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची अत्यंत सकारात्मकपणे तयारी करायला हवी. सूत्रांच्या हवाल्यान दिलेल्या वृत्तात आयएनएसने म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये चर्चा करुन निर्णय केला जाईल. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपल्या मित्रपक्षांचाही सन्मान करायला हवा, असा संदेशही गांधी यांनी दिला.

राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले की, जागावाटपाच्या सूत्रासाठी प्रदेश प्रभारी शक्ती सिंह गोहिल हे या आठवड्यात सर्व इच्छुकांसोबत चर्चा करतील. त्यासाठी लवकरच ते बिहारच्या दौऱ्यावर येतील. (हेही वाचा, अमित शाह यांना कोरोना विषाणूची लागण, रुग्णालयात दाखल; राहुल गांधी यांनी व्यक्त केली लवकर बरे होण्याची इच्छा)

सूत्रांच्या हवाल्याने समजते की, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मित्रपक्षांशी वाटाघाटी अधिक लवकर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन निवडणुकीची तयारी आणि प्रचारासाठी वेळ मिळेल, अशी भावना पक्षाचे नेते सदानंद सिंह यांनी बोलून दाखवली. त्याला राहुल गांधी यांनीही संमती दर्शवली. दरम्यान, माजी मंत्री शकील उज्जमान अन्सारी यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस नेते बाहेरच्या लोकांना निवडणूक तिकीट देतात असे सांगितले. तसेच, असे केल्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी वाढते, असेही या नेत्यांनी पक्षनेतृत्वासमोर सांगितले.