Maharashtra Vidhan Sabha Elections 2019: सर्वपक्षातून इनकमिंग फ्री ठेवणाऱ्या भाजपला धुळे (Dhule) जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे अनिल गोटे (Anil Gote) आता आघाडीच्या गळाला लागले असून, आता ते आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अनिल गोटे हे पुर्वाश्रमीचे भाजप आमदार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर गोटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. गोटे यांनी विधानसभा निवडणूक 2019 साठी धुळे शहर (Dhule City Constituency) मतदारसंघात आपल्या लोकसंग्राम संघटनेतर्फे निवडणूक अर्ज दाखल केला होता. मात्र, आघाडीने त्यांना पाठिंबा दिल्याने आता ते आघाडीचे उमेदवार म्हणून भाजप उमेदवाराविरोधात रिंगणात दिसणार आहेत.
अनिल गोटे हे अत्यंत वादग्रस्त आणि चर्चेत असलेले नाव आहे. अनिल गोटे यांनी विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, धुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावरुन आमदार गोटे आणि भाजप नेतृत्वात फारकत होत गेली. त्यातून गोटे आणि भाजप नेतृत्व एकमेकांवर नाराज झाले. त्यातूनच गोटे यांनी बंड केले आणि आपल्या लोकसंग्राम संघटनेतर्फे निवडणूक अर्ज दाखल केला.
आमदार अनिल गोटे यांचा आघाडीसोबत जाण्याचा निर्णय हा भाजप आणि भाजप नेते गिरिश महाजन यांच्यासाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाजन विरुद्ध गोटे असा पक्षांतर्गत सुप्त संघर्ष पाहायला मिळत होता. धुळे महापालिका निवडणूकीत हा संघर्ष अधिकच तीव्र झाला होता. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: 'भाजपने मला फसवलं'; रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचा गंभीर आरोप)
दरम्यन, धुळे जिल्ह्यातील जनतेची मला काळजी वाटते. लोकसंग्राम पक्षातर्फे उमेदवार असलेले अनिल गोटे निवडूण येणार नाहीत. गोटे निवडूण येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे खळबळजनक विधान गिरीश महाजन यांनी नुकतेच केले होते. महाजन यांच्या या विधानाचा अर्थ गोटे यांच्या आघाडीत सहभाही होण्याशी लावला जात आहे.