भारतीय लष्कराच्या अन्नात विष मिसळण्याचा ISI चा कट; गुप्तचर यंत्रणांनी दिली माहिती, हाय अलर्ट लागू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव चालू आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतचे सर्जिकल स्ट्राईक, अभिनंदनला अटक, विनाशर्त काल रात्री त्याची झालेली सुटका या सर्व घटनांमुळे दोन्ही राष्ट्रातील द्वेष अजूनच वाढत आहे. आता पाकिस्तान परत मोठी कुरघोडी करील यात शंका नाही, अशातच पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स (MI) आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) भारतीय लष्करांच्या जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. 'इंडिया टुडे'ने याबाबतचे वृत्त दिले असून, गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे.

भारतीय जवानांच्या रेशनिंगच्या धान्यामध्ये विष मिसळण्याचा कट रचल्‍याची माहिती आहे. यामुळे भारतीय लष्‍कराकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. लष्‍कराकडून जम्‍मू -काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्‍या सुरक्षा दलांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्‍या आहेत. शिवाय, जेवणाचे साहित्य खरेदी करताना सावधानता बाळगण्यासही सांगण्यात आले आहे. या इशाऱ्यानंतर गुप्तचर यंत्रणांकडून जवानांसाठी असणाऱ्या अन्न-धान्य गोदामांची सुरक्षा वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. (हेही वाचा: पाकिस्तान पडला एकटा; कोणत्याही इस्लामिक देशाचा समर्थन देण्यास विरोध)

दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, राजधानी दिल्‍लीसह देशातील महत्‍वाच्या शहरांमध्ये दहशतवादी संघटनेच्या हल्‍ल्‍याचा कट आहे. त्‍या पार्श्वभूमीवर मुंबई, दिल्‍लीसह मोठ्‍या शहरांमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.