Covishield Vaccine Update: कोविशिल्ड लशीबाबत सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांची महत्वाची माहिती
Adar Poonawalla (Photo Credit: ANI)

कोरोनावरील लस केव्हा येणार? याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असताना पंतप्रधान नरेद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज पुणे (Pune) येथे येऊन सीरम इन्स्टिट्युटला (Serum Institute) भेट दिली. नरेंद्र मोदी हे सुमारे एक तास सीरममध्ये असून त्यांनी लस निर्मिती व उत्पादनाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. यानंतर सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी कोविशिल्ड लशीबाबत (Covishield Vaccine) महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचे सगळ्यांचे लक्ष आहे. तसेच लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करत आहोत. या लशीची किंमत सर्व सामान्यांना परवडेल, यावर अधिक भर दिला जात आहे. महत्वाचे म्हणजे, पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत देशात 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे, अशीही माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.

सीरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला असून आतापर्यंत 4 कोटी डोसची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस 70 टक्के परिणामकारक आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लशीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अदर पुनावाला यांनी कोविशिल्ड लशीबाबत माहिती दिली आहे. हे देखील वाचा- COVID-19 Vaccine: पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये; सुप्रिया सुळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

एएनआयचे ट्विट-

कोरोनाने फक्त भारतावर नाही तर संपूर्ण जगावर संकट आणले आहे. अशात लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. जगभरात आतापर्यंत एकूण 6 कोटी 21 लाख 1 हजार 294 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 14 लाख 51 हजार 592 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 कोटी 28 लाख 90 हजार 825 जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी आकडेवारी वर्ल्ड ओ मीटर या वेबसाईटने दिली आहे.