COVID-19 Vaccine: पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये; सुप्रिया सुळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला
Supriya Sule (Photo Credits-Twitter)

कोरोनावरील लस केव्हा येणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असताना पंतप्रधान नरेद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज पुणे (Pune) येथील सीरम इन्स्टिट्युटला (Serum Institute) भेट दिली आहे. नरेंद्र मोदी हे सुमारे एक तास सीरममध्ये असून त्यांनी लस निर्मिती व उत्पादनाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये. तसेच जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे, असाही चिमटा देखील त्यांनी काढला आहे. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

"तुमच्या येथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर, दिल्लीत तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारते? हे तुम्हाला चांगले माहिती आहे. तेच आज आपल्या पुण्यात आले आहेत. बघा 'दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं. जग फिरल्यावर शेवटी लस सापडली आमच्या पुण्यात. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाही तर, कोणीतरी म्हणायचे मीच शोधली. पुण्यामध्येच ही लस निर्माण करण्यात आली आहे. पुणेकरांनी ती लस शोधली आहे. त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी दावा करू नये", अशा सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. हे देखील वाचा- Sudhir Mungantiwar on Thackeray Government: फडणवीसांचे सरकार गेले फसवणाऱ्यांचे सरकार आले, सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

सध्या सर्वांचच लक्ष सिरम इन्स्टीट्यूटकडे लागले आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस 70 टक्के परिणामकारक आहे. दरम्यान, मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी त्यांना सीरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. त्यावेळी नरेंद्र मोदींनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला आहे.