Coronavirus Crisis मध्ये ओला व उबरचा मोठा निणर्य; बंद केल्या प्रवाशांच्या आवडत्या ‘या’ महत्वाच्या सेवा
Ola and Uber (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) परिणाम देशातील जवळपास प्रत्येक मोठ्या क्षेत्रावर झाला आहे. सोबतच विविध अॅप आधारित कॅब सेवा, ओला  (Ola) आणि उबर (Uber) प्रदान करणार्‍या कंपन्यादेखील यातून सुटू शकल्या नाहीत. गेल्या काही दिवसांत या दोन कंपन्यांच्या बुकिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता ओला आणि उबर दोघांनीही आपली राइड्स शेअर करण्यावर बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की, जे ओलाच्या 'शेअर' आणि उबरच्या 'पूल' सेवेचा लाभ घेत होते ते आता काही दिवसांपर्यंत यापासून वंचित राहणार आहेत.

सध्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जगभरात सर्वजणच प्रयत्न करत आहेत. यासाठी अनेक देशांचे सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. भारतातही विविध कंपन्या आपल्यापरीने यात हातभार लावत आहेत. अशात ओला आणि उबर यांनी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी आपापल्या महत्वाच्या सेवा बंद केल्या आहेत. ओलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कंपनी पुढील सूचना येईपर्यंत 'ओला शेअर' सुविधा तात्पुरती बंद करत आहे’. (हेही वाचा: Coronavirus विरूद्ध लढण्यासाठी सरकारने बदलले धोरण; आता हॉस्पिटलमधील 'या' रुग्णांचीही होणार तपासणी)

मात्र कंपनीच्या मायक्रो, मिनी, प्राइम, रेंटल आणि आउटस्टेशन सेवा तशाच चालू राहतील. त्याचप्रमाणे उबरने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यात मदत करण्यास वचनबद्ध आहोत. त्यामुळे आम्ही ज्या शहरांमध्ये सेवा देतो, तिथे उबर पूलच्या सेवा निलंबित करण्यात येतील.’ ओला आणि उबर दोन्ही कंपन्यांच्या या सेवेमध्ये, एकाच मार्गावर प्रवास करणार्‍या बर्‍याच प्रवाशांना एकत्र प्रवास करण्याची सोय होती. या प्रवासी सेवेचे भाडे खूपच कमी आहे, यामुळेच मेट्रो शहरांमध्ये या सुविधेची मोठी मागणी आहे.