Nitish Kumar Take Oath as Bihar CM: नितीश कुमार यांनी 7 व्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्र्यांची शपथ; तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांची उपमुख्यमंत्रीपद निवड
नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना (PC - ANI)

Nitish Kumar Take Oath as Bihar CM: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या एक दिवस अगोदर एनडीएची पाटण्यात बैठक झाली. या बैठकीत नितीशकुमार यांना एकमताने विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर नितीशकुमार यांनी एनडीएच्या नेत्यांसमवेत राजभवन गाठले आणि राज्यपालांकडे सरकार स्थापण्यासाठी प्रस्ताव सादर केला.

राजभवनच्या राजेंद्र मंडप येथे शपथ कायदा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सीएम नितीश कुमार यांच्यासह कटिहारचे चौथ्यांदा आमदार बनलेल्या तारकिशोर प्रसाद आणि बेतियातील आमदार रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात जेडीयू नेते उपस्थित होते. त्याचवेळी, भाजपमधील बिहारच्या नेत्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेदेखील या शपथविधीत सहभागी झाले होते. (हेही वाचा - Nitish Kumar Oath Ceremony: नीतीश कुमार आज 7व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; होणार विक्रमाची नोंद)

दरम्यान, जनता दल (युनायटेड), भाजपा, विकास इन्सान पार्टी (व्हीआयपी) आणि हिंदुस्थानी आम मोर्चा (एचएएम) च्या नवनिर्वाचित आमदारांनी नितीशकुमार यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले. बिहारमधील 243 विधानसभा जागांपैकी एनडीएला जास्तीत जास्त 125 जागा मिळाल्या. ज्यामध्ये भाजपाला 74 जागा, जेडीयूला 43 जागा, राम मांझीच्या हिंदुस्तानी आम मोर्चाला 4 जागा आणि विकास इन्सान पक्षाला 4 जागा मिळाल्या. त्याचवेळी, महायुतीस 110 जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये आरजेडीला 75 जागा आणि कॉंग्रेसला 19 जागा मिळाल्या आहेत.