Nitish Kumar Oath Ceremony: नीतीश कुमार आज 7व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; होणार विक्रमाची नोंद
Bihar CM Nitish Kumar (Photo Credits: Facebook)

एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्री (Bihar CM) पदी पुन्हा एकदा नीतीश कुमार विराजमान होणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. आज तब्बल 7 व्यांदा नीतीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 4.30 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर नीतीश कुमार यांच्या नावे एका विक्रमाची नोंद होणार आहे. 7 व्यां दा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नीतीश कुमार हे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. आतापर्यंत असा विक्रम कोणत्याही नेत्याच्या नावावर नाही. बिहारच्या मुख्यमंत्री पदी नीतीश कुमार विराजमान होणार असून उपमुख्यमंत्री पदाची धुरा तारकिशोर प्रसाद किंवा रेणु देवी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत.

दरम्यान, रविवारी एनडीएच्या घटक पक्षाची पाटण्यात बैठक पार पडली. ज्यामध्ये जनता दल (युनायटेड), भाजपा, विकास इन्सान पार्टी (व्हीआयपी) आणि हिंदुस्थानी आम मोर्चा (एचएएम) च्या नवनिर्वाचित आमदारांनी नितीशकुमार यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले. यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना नेते म्हणून निवडण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर राजभवनात नीतीश कुमार यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. आज ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

नीतीश कुमार यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द:

सर्वप्रथम 2000 मध्ये नीतीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांचा कार्यकाळ केवळ 7 दिवसांचा होता. त्यानंतर 2005 मध्ये नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2010 मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 2014 मध्ये चौथ्यांदा, 2015 मध्ये पाचव्यांदा आणि 2017 मध्ये सहाव्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथी घेतली. त्यानंतर आज सातव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, 243 जागांसाठी झालेल्या बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपला 74, जेडीयूला 43 आणि इतर मित्रपक्षांना 8 जागा मिळाल्या. त्यामुळे एकूण 124 जागांवर विजय मिळवल्याने एनडीएचा सत्तास्थपानेचा मार्ग मोकळा झाला. तर महागठबंधनला 110 जागांवर समाधान मानावे लागले.