UCO Bank: बिर्ला सूर्या लिमिटेड समूहाचे संचालक Yashovardhan Birla दिवाळखोर: युको बँक
Yashovardhan Birla | ((Photo Credits: Archived, Modified, Representative image)

बिर्ला सूर्या लिमिटेड (Birla Surya Limited) समूहाचे संचालक यशोवर्धन (यश) बिर्ला (Yashovardhan Birla) यांना युको बँकेने विलफूल डिफॉल्टर (जाणूनबुजून चुक करणारा) अर्थातच कर्जबुडवे म्हणून जाहीर केले आहे. युको बँकेने विविध माध्यमांतून बिर्ला यांच्याबद्दलची माहिती सोमवारी जाहीर केली. 67.65 कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी युको बँकेने यश बिर्ला हे दिवळखोर असल्याची माहिती छायाचित्रासह प्रसारित केली. यश बिर्ला हे यश बिर्ला समूहाचे अध्यक्ष, उद्योगपती आणि ‘पेज ३’संस्कृतीत मोठा वावर असलेले नाव आहे.

दरम्यान, बँकेने म्हटले आहे की, 3 जून, 2019 ला बिर्ला यांच्या बँक खात्याला नॉन-परफॉर्मिंग लोन (Non-performing Loan) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. युको बँकेने प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ''बिर्ला सूर्या लिमिटेड च्या मुंबई येथील नरीमन प्वॉईंट येथील मफतलाल सेंटर मध्ये आमच्या प्रमुख कॉर्पोरेट शाखेतील मल्टी क्रिस्टेलाइन सोलर फोटोवोल्टेक सेल्स बनविण्यासाठी केवळ फंड आधारित सुविधांसोबत 100 कोटी रुपयांच्या पत मर्यादेस (Credit limit) मान्यता देण्यात आली होती. NPA मध्ये आज घडीला 67.65 कोटी रुपयांचे कर्ज आणि चुकते न केलेले व्याज शिल्लख आहे. ''

विशेष म्हणजे बिर्ला यांची दिवाळखोरी बँकेकडून घोषीत होणे हे औद्योगिक आणि बँकिंग विश्वात काहीसे निराळे मानले जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे. यश बिर्ला यांचे आजोबा जी.डी. बिर्ला यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली युको बँकेची स्थापना 1943 मध्ये झाली होती. एखाद्या प्रसिद्ध उद्योगपती, सेलीब्रेटी व्यक्तीची छायाचित्रासह दिवाळखोरी जाहीर होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. बिर्ला यांच्या कोलकातास्थित समूहाला बँकेच्या मुंबईतील शाखेने कर्ज मंजूर केले होते. (हेही वाचा, पाकिस्तानची दिवाळखोरीकडे वाटचाल; सरकारच्या तिजोरीत 60 दिवस पुरतील एवढेच पैसे शिल्लक)

युको बँकेने म्हटले आहे की, सौर ऊर्जा क्षेत्रातील उत्पादन निर्मितीकरिता बिर्ला यांच्या बिर्ला सूर्या लिमिटेड कंपनीने बँकेकडून 100 कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. या कर्जापैकी यश बिर्ला यांच्याकडून येणी असलेली रक्कम 3 जून 2019 अखेर 67.65 कोटी रुपये इतकी आहे. उर्वरित रक्कम थकीत असल्याचेही बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.