नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या मंत्रालयांतर्गत गेल्या काही वर्षांमध्ये देशातील रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा सर्वात मोठे रोड नेटवर्क असलेला देश बनला आहे. या विक्रमात भारताने प्रतिस्पर्धी चीनला पराभूत करून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की 2014 पासून भारताने जास्तीत जास्त रस्त्यांच्या जाळ्याच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे आणि गेल्या 9 वर्षात देशात 1.45 लाख किलोमीटरचे रस्ते बांधले गेले आहेत.
पत्रकार परिषदेत गडकरींनी गेल्या 9 वर्षांच्या मंत्रिमंडळात केलेल्या कामांची मोजदाद केली. ते म्हणाले की, गेल्या 9 वर्षांत भारताने अनेक ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे भारताच्या रस्त्यांना जोडले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) लवकरच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग पूर्ण करणार आहे. हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल. गडकरी म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी भारतात 91.287 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले होते.
गडकरींच्या कार्यकाळात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवीन रस्ते बांधण्यासाठी अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गाचा समावेश आहे. एप्रिल 2019 पासून आतापर्यंत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने संपूर्ण भारतात 30 हजार किलोमीटरहून अधिक रस्ते बांधले आहेत. गडकरींच्या काळात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने रस्त्यांच्या बाबतीत 7 जागतिक विक्रम केले आहेत. (हेही वाचा: युएईचा लुलू ग्रुप भारतामध्ये करणार 10,000 कोटींची गुंतवणूक; मिळणार हजारो लोकांना नोकऱ्या)
या वर्षी मे महिन्यात एनएचएआयने 100 किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस वेचे काम 100 तासात पूर्ण केले. गाझियाबाद-अलिगढ एक्स्प्रेसमध्ये हा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. मंत्रालयाने टोल प्लाझाच्या माध्यमातूनही महसूल वाढवला असल्याचे गडकरींनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, टोलमधून मिळणारा महसूल आता वाढून 41,342 कोटी रुपये झाला आहे, जो पूर्वी फक्त 4,770 कोटी रुपये होता.