Indian Air Force (Pic Credit - IAF Twitter)

जगातील विविध राष्ट्रांच्या हवाई दलांच्या एकूण लढाऊ सामर्थ्याच्या बाबतीत भारतीय वायुसेना (IAF) जागतिक हवाई शक्ती निर्देशांकात तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) ने 2022 चे ग्लोबल एअर पॉवर्स रँकिंग प्रकाशित केले आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेला पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या वर स्थान देण्यात आले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सला 'चिनी वायुसेना' देखील म्हटले जाते. अहवालानुसार, भारतीय वायुसेना जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्स (JASDF), इस्रायली वायुसेना आणि फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाच्या वर आहे. न्यूज नाइनने याबाबत वृत्त दिले आहे.

वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट अनेक घटकांचा विचार करून त्यांचे मूल्यमापन करते. वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टनुसार, हे रँकिंग केवळ हवाई दलाकडे असलेल्या विमानांच्या संख्येवर आधारित नाही तर त्यांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक सपोर्ट, संरक्षण आणि हल्ला क्षमता यावरही आधारित आहे. WDMMA ने 98 देशांचा मागोवा घेतला आहे. ज्यामध्ये 124 हवाई सेवा समाविष्ट आहेत आणि एकूण 47,840 विमाने आहेत.

ग्लोबल एअर पॉवर्स रँकिंग (2022) अहवालाने युनायटेड स्टेट्स एअर फोर्स (USAF) ला सर्वोच्च TvR स्कोअर दिला आहे. त्यात 5209 विमाने आहेत, यापैकी 4167 विमाने कधीही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहेत. त्यांच्याकडे हल्ला करण्यासाठी 1976 लढाऊ विमाने, समर्थनार्थ 1692 विमाने, प्रशिक्षणासाठी 1541 विमाने आहेत. भविष्यात ते आणखी 2419 विमाने खरेदी करणार आहेत. त्यात 152 बॉम्बर विमाने आहेत, 213 हेलिकॉप्टर आहेत व 677 वाहतूक विमाने आहेत.

रशियन एअरफोर्सला 114.2 TvR मिळाले आहे. त्यांच्याकडे एकूण 3829 विमाने आहेत. यापैकी 3063 विमाने कधीही उड्डाणासाठी सज्ज आहेत. रशियाकडे 1507 हल्ला, 1837 सपोर्ट आणि 485 प्रशिक्षण विमाने आहेत. भारतीय हवाई दलाला 69.4 TvR मिळाले आहेत. यात एकूण 1645 विमाने आहेत. चीनकडे भारतापेक्षा जास्त विमाने आहेत, पण राफेलचे आगमन आणि तेजस फायटर जेटचे अपग्रेड आणि इतर अनेक प्रकारच्या आधुनिकीकरणामुळे भारताचे रँकिंग वर आले आहे. भारताकडे 1316 विमाने युद्धासाठी सज्ज आहेत किंवा कधीही उड्डाणासाठी सज्ज आहेत. भारताकडे 632 हल्ला, 709 सपोर्ट आणि 304 प्रशिक्षण विमाने आहेत. भविष्यात 689 विमाने खरेदी करण्याची योजना आहे. भारतीय हवाई दलाकडे 438 हेलिकॉप्टर आहेत. 250 वाहतूक विमाने, 7 इंधन भरणारे आणि 14 विशेष मिशन विमाने आहेत.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सला 63.8 TvR मिळाले आहे. चिनी हवाई दलाकडे 2084 विमाने आहेत, यापैकी 1667 विमाने कधीही उडण्यास सज्ज असतात. जपानी हवाई दलाला 58.1 TvR मिळाले आहे. एकूण 779 विमाने आहेत व यापैकी 623 विमाने कधीही उडण्यास सज्ज असतात. इस्रायली हवाई दलाला 58 TvR मिळाले आहेत. यात एकूण 581 विमाने आहेत. त्यापैकी 465 नेहमीच युद्धासाठी तयार असतात. (हेही वाचा: 5G Call: आयआयटी मद्रास येथे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G कॉलची चाचणी केली)

फ्रेंच हवाई दलाला 56.3 TvR मिळाले आहे. यात एकूण 658 विमाने आहेत. त्यापैकी 526 विमाने कधीही उड्डाणासाठी सज्ज आहेत. ब्रिटिश रॉयल एअर फोर्सला 55.3 TvR मिळाले आहे. यात एकूण 479 विमाने आहेत व त्यापैकी 383 विमाने कधीही युद्धासाठी सज्ज आहेत. दक्षिण कोरियाच्या हवाई दलाला 53.4 TvR मिळाले आहे. त्यांच्याकडे 890 विमाने आहेत. त्यापैकी 712 कधीही युद्धासाठी किंवा तत्सम परिस्थितीसाठी सज्ज आहेत. इटालियन हवाई दलाला 51.9 TvR मिळाले आहे. त्यांच्याकडे एकूण 506 विमाने आहेत, त्यापैकी 405 कधीही तयार आहेत.