मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य सत्तेवर येताच केवळ ६ तासांच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) गेली साडेचार वर्षे सत्तेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची एक रुपयाचीही कर्जमाफी ( waive loans) केली नाही. पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर, उद्योगपतींसाठी काम करतात. हा देश कोणा 15 ते 20 उद्योगपतींचा नाही. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वांचा आहे. काँग्रेस आणि सर्व विरोधकांना एकत्र घेऊन आम्ही पंतप्रधान मोदी आणि सरकारवर दबाव टाकू. पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करुच. जो पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीत तोपर्यंत मोदींना झोप लागू देणार नाही, अशा तिव्र शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढवला. नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा घोटाळा होता असा आरोपही राहुल गांधी यांनी या वेळी केला.
दिलेले अश्वासन पूर्ण केले
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यावर दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे अश्वासन मी दिले होते. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफई झाली. छत्तीगडमध्ये लवकरच होणार आहे. सरकार सत्तेवर येताच केवळ ६ तासांत आम्ही अश्वासन पूर्ण केले. याचाच अर्थ आमची कामगिरी दहा पटीने चांगली आहे. असे स्वताच्या सरकारबद्दल कौतुकोद्गारही राहुल गांधी यांनी काढले.
नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा घोटाळा
नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा घोटाळा होता. सर्वसामान्य जनतेचा पैसा बाहेर काढून तो उद्योगपतींना स्वाधीन करणे हाच या निर्णयाचा मुख्य उद्देश होता, असा हल्ला राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर चढवला.
राफेल मुद्द्यावरुन मोदी पळ काढत आहेत
आम्ही शांततेने संवाद करु इच्छितो असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मग आम्ही राफेल मुद्द्यावर चर्चेची मागणी करतो आहोत तर, सरकार का पळ काढते आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या पैशाची चोरी केली. हा पैसा कर्जबाजारी असलेल्या अनिल अंबाणी यांच्या कंपनीला दिले. राफेल मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाला दिलेली माहिती ही टायपो एरर असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिल्याकडे लक्ष वेधले असता. ही सुरुवात आहे. आता हळूहळू अनेक टायपो एरर पुढे येतील असा टोला राहुल यांनी मोदी सरकारला लगावाल. हा देश शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा आहे. कोणा 10 ते 15 उद्योजकांचा नाही, असा पुनरुच्चाही त्यांनी केला. (हेही वाचा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, मुख्यमंत्री कमलानाथ यांचा निर्णय)
1984 दंगल प्रकरणावर मौन
दरम्यान, 1984मध्ये झालेल्या दंगलप्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना झालेल्या शिक्षेबाबत विचारले असता ही पत्रकार परिषद शेतकरी कर्जमाफी संबंधी, राफेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराबाबत आहे. त्यामुळे त्या विषयावर प्रश्न विचारा असे सांगत सज्जन कुमार यांना झालेल्या शिक्षेबाबतच्या प्रश्नाला बगल देत राहुल यांनी मौन बाळगले.