
भारतातील लोकांमध्ये रेबीजबद्दल (Rabies) अनेक गैरसमज आहेत. यामध्ये सर्वात मोठा गैरसमज असा आहे की, हा संसर्ग फक्त कुत्र्याच्या चाव्यामुळे होतो. मात्र तसे नाही, कधीकधी रेबीज संसर्ग झालेल्या प्राण्याची लाळ मानवी जखमेच्या किंवा शरीराच्या उघड्या भागाच्या संपर्कात आल्यावर किंवा रेबीज झालेल्या प्राण्याचे दूध सेवन केल्यानेही हा संसर्ग होऊ शकतो. ग्रेटर नोएडामधून (Greater Noida) असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे रेबीज संक्रमित गायीचे दूध प्यायल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ग्रेटर नोएडाच्या जेवर भागातील थोरा गावात ही धक्कादायक घटना घडली.
अहवालानुसार, हे कुटुंब पशुपालन करून आपला उदरनिर्वाह करत होते. महिलेच्या घरी असलेल्या एका गायीला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र कुटुंबातील सदस्यांना याची जाणीव नव्हती. पुढे गायीला रेबीज झाला मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याने कुटुंबाने गायीचे दुध पिणे सुरूच ठेवले. मात्र, जेव्हा कुटुंबातील सदस्यांना गायीमध्ये रेबीजची लक्षणे दिसली, तेव्हा त्यांनी ताबडतोब इंजेक्शन घेतले, परंतु या महिलेला इंजेक्शन मिळाले नाही. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
दोन महिन्यांपूर्वीच गायीने एका वासराला जन्म दिला होता. त्यानंतर महिलेने गायीने दिलेले दूध सेवन केले. गावातील इतर लोकही या गायीचे दूध प्यायले. गायीला रेबीज झाल्याचे कळताच गावातील दहा लोकांनी इंजेक्शन घेतले. पण त्या महिलेने इंजेक्शन घेतले नाही, परिणामी तिला संसर्ग झाला आणि अखेर तिचा मृत्यू झाला. सीमाने प्रकाशाची भीती आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. पण अनेक रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास करण्यास नकार दिला. (हेही वाचा: Obesity and Diabetes Management Drug Mounjaro: अमेरिकन फार्मा कंपनी Eli Lilly ने भारतामध्ये लाँच केले लठ्ठपणा आणि मधुमेह उपचारांसाठी नवीन औषध; जाणून घ्या किंमत)
शेवटी तिला दिल्लीच्या बसंत कुंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला रेबीज झाल्याचे सांगितले आणि घरी पाठवले. मात्र, गुरुवारी तिचे निधन झाले. या घटनेमुळे गावातील आणि परिसरातील लोकांमध्ये भटक्या कुत्र्यांची भीती आहे. जेवर येथील रहिवासी त्रिलोक म्हणाले की, जेवर परिसरात भटक्या कुत्र्यांचा दहशत सतत वाढत आहे. केवळ थोरा गावातच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्येही कुत्र्यांनी चावण्याच्या घटना दररोज घडत आहेत, ज्यामुळे अनेक लोक जखमी होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही रेबीज इंजेक्शन्स उपलब्ध नसल्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्रिलोक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रेबीज इंजेक्शन देण्याची मागणी केली आहे.