Obesity | Representational image (Photo Credits: pxhere)

स्थूलता आणि टाइप 2 मधुमेह (Obesity and Type 2 Diabetes) या भारतामधील दोन मोठ्या समस्या आहेत. अलीकडील संशोधनामुळे अशी औषधे विकसित झाली आहेत, जी मधुमेह आणि वजन कमी करण्यास मदत करतात. आता भारतातील मधुमेह आणि लठ्ठपणाच्या वाढत्या घटना लक्षात घेता अमेरिकन औषध कंपनी एली लिलीने (Eli Lilly) एक नवीन औषध लाँच केले आहे. औषधाचे नाव मोंजारो (Mounjaro) आहे. हे औषध इंजेक्शनच्या स्वरूपात आहे. त्याच्या 2.5 मिलीग्रामच्या कुपीची किंमत 3,500 रुपये आणि 5 मिलीग्रामच्या कुपीची किंमत 4,375 रुपये आहे. हे औषध आठवड्यातून एकदा घ्यावे लागते. औषधोपचारासाठी दरमहा 14,000 ते 17,500 रुपये खर्च येईल. भारतात वाढत्या लठ्ठपणाच्या प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी हे औषध कमी किमतीत उपलब्ध करून दिले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने सांगितले की, या औषधासाठी त्यांनी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडून मान्यता घेतली होती. कंपनीचे म्हणणे आहे की, लठ्ठपणा, जास्त वजन आणि टाइप 2 मधुमेहासाठी पहिल्यांदाच असे औषध बनवण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हे औषध GIP (ग्लुकोज-आश्रित इन्सुलिनोट्रोपिक पॉलीपेप्टाइड) आणि GLP-1 (ग्लुकॅगॉन-सारखे पेप्टाइड-1) हार्मोन रिसेप्टर्स सक्रिय करते. हे हार्मोन्स शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

हे औषध विशेषतः टाइप-2 मधुमेह आणि लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, 15 मिलीग्राम डोस घेणाऱ्या रुग्णांचे सरासरी 21.8 किलो वजन कमी झाले, तर 5 मिलीग्राम डोस घेणाऱ्या रुग्णांचे 15.4 किलो वजन कमी झाले. मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी जीएलपी-1 श्रेणीतील औषधांची मागणी देशात आणि जगात खूप वाढली आहे. त्याची बाजारपेठ अब्जावधी डॉलर्सची झाली आहे. भारतात लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 10 कोटींहून अधिक लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. याशिवाय, 10 कोटी लोक लठ्ठपणामुळे मधुमेहाने ग्रस्त आहेत, त्यापैकी जवळजवळ निम्म्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. (हेही वाचा: Screen Use and Myopia Risk: दररोज एक तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहत असाल तर सावधगिरी बाळगा; अहवालात समोर आली भयावह माहिती)

लठ्ठपणामुळे केवळ मधुमेहच होत नाही तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, झोपेशी संबंधित समस्या आणि इतर आजार देखील लोकांवर परिणाम करत आहेत. एली लिली इंडियाचे प्रमुख विन्सेलो टकर म्हणाले की, कंपनी भारतातील सरकार आणि आरोग्य संस्थांसोबत या आजाराला रोखण्यासाठी आणि उपचार सुधारण्यासाठी काम करेल. अलिकडच्या काळात, भारतात लठ्ठपणा कमी करणाऱ्या औषधांची मागणी झपाट्याने वाढली आहे. याआधी 2020  मध्ये, लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक औषधे बाजारात आली. ज्याचे बाजार मूल्य 137 कोटी रुपये होते, जे 2024 मध्ये वाढून 535 कोटी रुपये झाले.