Parliament | (Photo Credits: X/ANI)

लोकसभा निवडणूक 2024 नंतर संसदेचे (Indian Parliament) पहिलेच हिवाळी अधिवेशन (Winter Session 2024) आजपासून (25 नोव्हेंबर) सुरु होत आहे. लोकसभेमध्ये ताकद वाढल्याने विरोधक काहीसे आत्मविश्वासात दिसत आहेत. असे असले तरी, हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजप नेतृत्वाखालील एनडीएच्या दणदणीत विजयानंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये हे अधिवेशन पार पडते आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येही आत्मविश्वास आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनात 'एक राष्ट्र, एक निवडणूक' (One Nation One Election) प्रस्ताव चर्चेस येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला वक्फ दुरुस्ती (Waqf Amendment Bill), आपत्ती व्यवस्थापन (Amendment) ( Disaster Management Bill), बँकिंग कायदे (Amendment), रेल्वे कायदा (Amendment) अशी काही विधेयके आणि विधेयकांमधील सुधारणा चर्चेत येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळू शकतो.

अधिवेशन आणि प्रमुख घडामोडी

विरोधी पक्षांची बैठकः इंडिया आघाडीचे नेते त्यांची रणनीती तयार करण्यासाठी आज सकाळी संसद भवनात बैठक घेणार आहेत. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, वाढती बेरोजगारी आणि उत्तर भारतातील वाढत्या प्रदूषणासह गंभीर समस्यांबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेत विरोधकांची ताकद वाढली आहे. मात्र, असे असले तरी, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे विरोधक काहीसे गळपाटल्याचे चित्र आहे. त्यामुळे आत्मविश्वासाला धक्का पोहोचलेले विरोधक निवडणुकीस कसे सामोरे जातात, याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Parliament Winter Session 2024: संसदेचे हिवाळी अधिवेशन आज पासून होणार सुरु,वक्फ ते बँकिंग कायदे विधेयकावर होणार चर्चा)

सरकारचा सत्रपूर्व संपर्कः  संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक रविवारी झाली. ज्यामध्ये संसदेची कार्यवाही सुरळीत होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सहकार्य मागितले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीत या विनंतीचा पुनरुच्चार केला. विरोधकांची वाढलेली ताकद पाहता सत्ताधारीही काहीसे बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे सत्ताधारी काहीसे आत्मविश्वासात दिसत आहेत.

विधेयकांवर वादळी चर्चा अपेक्षीत

अधिवेशनाचा कालावधी आणि विधेयकेः हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाची विधेयके चर्चेत येण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयक, आपत्ती व्यवस्थापन (Amendment), बिल बँकिंग कायदे (Amendment), बिल रेल्वे कायदा (Amendment), बिल बँकिंग कायद्यात सुधारणा, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा आणि बँकिंग नियमन कायदा यांसारखी विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे कायद्यातील दुरुस्ती परिचालन आणि नियामक बदलांवरही चर्चा अपेक्षीत आहे.

'एक राष्ट्र, एक निवडणूक' विधेयक चर्चेत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एकसंध निवडणूक प्रणाली लागू करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. त्यामुळे हे विधेयकसुद्धा चर्चेत येते की काय अशी चर्चा आहे. मात्र त्याबाबत विशेष माहिती मिळू शकली नाही.

राज्यसभेतही चर्चा: विमानाची रचना, देखभाल आणि परिचालन नियंत्रित करण्याच्या उद्देशाने भारतीय वायुयान विधायक, 2024 (Bharatiya Vayuyan Vidheyak, 2024) या विधेयकावर वरच्या सभागृहात चर्चा होणे अपेक्षित आहे.

विरोधकांसमोर आव्हान

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधील पराभवानंतर विरोधी पक्ष तुलनेने कमकुवत पायावर अधिवेशनात प्रवेश करत आहेत. मात्र, सत्ताधारी आघाडीच्या वर्चस्वाचा सामना करण्यासाठी मणिपूरचे संकट आणि आर्थिक आव्हानांसह महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याची त्यांची योजना आहे. शिवाय त्यासाठी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळसुद्धा आहे.