Wing Commander Abhinandan Varthaman (Photo Credits: PTI)

भारतीय वायुसेनेचा पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) याच्या शौर्याचे चहुबाजूने कौतुक होत आहे. त्यातच आता त्याच्या शौर्याला सलाम करणारा निर्णय राजस्थान राज्य सरकारने घेतला आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याची गाथा आता शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही शौर्य, धाडस, देशाभिमान याचे धडे मिळतील. विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याला हटके सलाम! कोल्हापूरमध्ये अभिनंदन यांच्यासारखा मूंछ कट ठेवणाऱ्यांचे शेविंग मोफत

राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह दोतसरा (Govind Singh Dotasra) यांनी ट्विट करुन या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "जोधपूरमध्ये शिकलेल्या विंग कमांडर अभिनंदनच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी अभिनंदनच्या शौर्याची कथा राजस्थानच्या शालेय पाठ्यपुस्तकात सहभागी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे."

14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर या भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची स्थळं उद्धवस्त केली. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी वायुसेनेची तीन विमान सीमारेषा ओलांडत भारतात आली. घुसखोरी केलेल्या या विमानांना पळवून लावताना पाकिस्तानचे F-16 हे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. मात्र  विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले. पाकिस्तानतही त्यांनी दाखवलेले धाडस वाखाण्याजोगे होते. त्यानंतर तब्बल 60 तासांनी त्यांची सुखरुप सुटका झाली.

अभिनंदन यांच्या या शौर्यगाथेचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात येणार आहे. मात्र कोणत्या इयत्तेसाठी अभिनंदन यांचा धडा शिकवण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर पुलवामा शहीदांच्या कथेचाही पाठ्यपुस्तकात समावेश केला जाणार आहे.