
पाकिस्तानच्या विमानाचा हवाई हल्ला परतवत असताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान (Wing Commander Abhinandan) पाकिस्तानाच्या तावडीत सापडले. 60 तास पाकिस्तानामध्ये घालवल्यानंतर अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भारतीयांनी अनेक गोष्टी केल्या. कोल्हापूरमध्येही (Kolhapur) अभिनंदन यांच्या शौर्याला अनोख्या प्रकारे सलाम केला जात आहे. अनेक तरुण कोल्हापूरमध्ये अभिनंदन यांच्याप्रमाणेच मिशी कापून घेत आहे. आणि या खास अभिनंदन स्टाईल मिशी मोफत शेव्ह करून दिल्या जात आहेत.
कोल्हापूरमध्ये राजारामपुरी भागामध्ये असलेल्या Hair Affair या सलोन कडून तरुणांना अभिनंदन स्टाईल मिशी आणि हेअर कट मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. या सलोनचे मालक भालेकर बंधू यांनी ही आगळीवेगळी संकल्पना सुरु केली आहे. या सलोनच्या मालकांपैकी एक धनंजय भालेकर यांनी देखील अभिनंदन स्टाईल मिशी ठेवली आहे. त्यांच्याकडे अनेक ग्राहक आकर्षित होत आहेत. विंग कमांडर अभिनंदन यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही स्टाईल कोल्हापूरकर करत आहेत.
क्रिकेट किंवा एखाद्या खेळाडूच्या हेअर स्टाइलचे चाहते त्यांच्याप्रमाणे स्टाइलिंग करताना अनेकदा पाहिलं असेल पण एखाद्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याबदल हे पहिल्यांदा घडत आहे. सध्या विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर दिल्लीत उपचार सुरु आहेत. लवकरच त्यांची वैद्यकीय तपासणी होईल आणि हवाई दलात ते पुन्हा रुजू होण्याबाबत निर्णय दिला जाईल.