प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च पासून महाराष्ट्र सह संपूर्ण देश लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे, व्यवसाय बंद होते. लॉकडाऊनचा हा कालावधी चार टप्प्यात वाढण्यात आला. त्यानंतर अनलॉक 1 (Unlock 1) च्या माध्यातून जूनच्या पहिल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने सेवा-सुविधा पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. आता 28 जून पासून केश कर्तनालय, सलून (Salon) आणि ब्युटी पार्लर (Beauty Parlor) या सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान केश कर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लरची पुणे (Pune) शहरासाठीच्या नियमांची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Maharashtra Unlock 1: केस कापा पण दाढी करु नका! महाराष्ट्रात केशकर्तनालयं सुरु करण्यास परवानगी- राज्य सरकार)

पाहुया केश कर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लरची पुणे शहरासाठीची नियमावली:

# केश कर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लर या ठिकाणी केवळ पूर्व नियोजित वेळ निश्चित करुन म्हणजेच appointment घेऊन जावे, असे सांगण्यात आले आहे.

# कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी म्हणजेच खुर्च्या, दुकानातील मोकळी जागा, फरशी, इत्यादी प्रत्येक 2 तासांनी सॅनिटाईज होणे आवश्यक आहे.

# दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांसाठी केवळ एकदाच वापरता येणारे (Disposable) टॉवेल/नॅपकिनचा वापर करावा. सेवेकरिता जी उपकरणे एकदा वापरण्याजोगी नाहीत (Non Disposable) ती प्रत्येक सेवेनंतर सॅनिटाइज आणि निर्जंतुक करूनच वापरावीत.

# केशकर्तन अनुषंगाने व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक दुकानावर वरीलप्रमाणे काळजी घेतली जाते, अशा आशयाची नोटीस माहितीसाठी प्रसिध्द करावी.

# केशकर्तन, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग, इत्यादी सेवा देता येतील, मात्र त्वचेशी निगडीत कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नाहीत, याबाबत सूचना दुकानावर असाव्यात.

# कर्मचाऱ्यांनी संरक्षित साहित्य जसे हातमोजे, अप्रोन आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ ट्विट:

अनलॉक 1 च्या माध्यमातून लॉकडाऊनचे नियम शिथिल करत काही व्यवसायांना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सलून व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी सातत्याने होत होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे सलून व्यवसायला मुभा देण्याची विनंती केली होती. अखेर केश कर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास परवानगी देत सरकारने अनेक व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.