Unlock 1 अंतर्गत सलून व्यवसाय पुन्हा सुरु करण्यास परवानगी द्यावी; खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटच्या माध्यमातून विनंती
Supriya Sule (Photo Credits: Twitter)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प होते. 24 मार्चपासून सुरु झालेला लॉकडाऊनचा कालावधी चार टप्प्यात वाढवण्यात आला. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून 'मिशन बिगेन अगेन' (Mission Begin Again) म्हणत पुन्हा एकदा राज्यातील विविध सेवा सुविधा सुरु करण्यात आल्या. परंतु, अनलॉक 1 अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केशकर्तनालय किंवा सलून या व्यवसायांना परवानगी दिली नाही. त्यामुळे नाभिक समाजा समोरील आर्थिक अडचणी कायम आहेत. ही बाब लक्षात घेऊन सलून व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

विनंती करण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी लिहिले, "कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे सलूनचा व्यवसाय पुर्णतः बंद आहे. या व्यवसायावरच उदरनिर्वाह करणारा नाभिक समाज यामुळे प्रचंड अडचणीत आहे. हा व्यवसाय करणारी अनेक कुटुंबे सध्या आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत. त्यामुळे सर्वांची बिकट आर्थिक अवस्था लक्षात घेता, त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा." तसंच सलूनचालक सोशल डिस्टन्सिंग इतर काळजी देखील घेतील, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (Coronavirus In Maharashtra: तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी पहा)

Supriya Sule Tweet:

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 90787 वर पोहचला आहे. तर 3289 रुग्णांचा कोविड-19 च्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तसंच 44849 रुग्णांवर उपचार सुरु असून 42639 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु असून अनलॉक 1 अंतर्गत जीम, गार्डन, दुकाने, शैक्षणिक संस्था, खाजगी कार्यालये यांना काही अटी, शर्थींच्या आधारे परवानगी देण्यात आली आहे.