Coronavirus Outbreak in India: ट्रेनच्या AC Coach मधून हटवले पडदे, ब्लँकेट; COVID-19 संक्रमण टाळण्यासाठी सेंट्रल-वेस्टर्न रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI/IANS)

डिसेंबर 2019 पासून चीन (China) च्या वुहान (Wuhan) शहरातून कोरोना व्हायरसचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आणि आता या व्हायरसने संपूर्ण जगाला हादरुन सोडले आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत जगभरात 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 150000 अधिक लोकांना कोविड-19 (COVID-19) चे संक्रमण झाले आहे. भारतातही कोरोना व्हायरसने आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 100 इतकी झाली आहे. तर यामुळे दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने याला 'राष्ट्रीय आपत्ती' म्हणून घोषित केले आहे. (COVID-19: भारतात कोरोना च्या रुग्णांची संख्या 100 पार; नरेंद्र मोदी सरकारने खबरदारीसाठी अवलंबले 'हे' उपाय)

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी सरकारकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेने AC ट्रेनच्या डब्यातून पडदे आणि ब्लँकेट बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. हे पडदे आणि ब्लँकेट्स रोज धुतले जात नसल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर चादरी, टॉवेल आणि बेड रोल यांच्या प्रवाशांकडून सातत्याने होणाऱ्या वापरामुळे कोरोना व्हायरसचा धोका अधिक वाढेल. म्हणूनच पुढील आदेश मिळेपर्यंत जुने पडदे आणि ब्लँकेट ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले आहेत.

पहा ट्विट:

कोरोना व्हायरसचा धोका रोखण्यासाठी एसी डब्ब्यातील पडदे, ब्लँकेट्स ताबडतोब हटवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे प्रवक्तांनी दिली. त्याचबरोबर प्रवाशांना स्वतःचे ब्लॉकेंट्स आणण्यास सांगण्यात आले आहे. मात्र गरजेसाठी काही अधिक चादरींची सोय ट्रेनमध्ये करण्यात आली आहे.