COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

चीन (China), इटली (Italy),ऑस्ट्रेलिया (Australia), अमेरिका (America) पाठोपाठ आता भारतात सुद्धा कोरोना (Coronavirus) चा हाहाकार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत भारतातील विविध राज्यांमधून कोरोनाचे तब्बल 100  हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यांचीच संख्या 31 इतकी आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यात 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेजेस, सिनेमागृह, व एकूणच सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयपीएल सहित अनेक मोठमोठे कार्यक्रम सुद्धा या कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांवर विलगीकरण करून उपचार सुरु आहेतच तसेच संशयिताना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, मात्र यापुढे कोरोनाची लागण पसरू नये यासाठी सुद्धा काही खास नियम नरेंद्र मोदी (Narendra Modi)  सरकारने ठरवले आहेत. COVID-19: कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे SAARC देशांना खास आवाहन; पाकिस्तान सह या '6' देशांनी दर्शवला पाठिंबा

प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने नुकतीच देशात कोरोना आपत्ती जाहीर केली असून याअंतर्गत राज्य सरकारे आपत्ती व्यवस्थापन खात्यातील निधी हा कोरोना चा सामना करण्यासाठी वापरू शकणार आहेत. यासोबतच कोणत्या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत याचा थोडक्यात आढावा जाणून घ्या..

- दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, हरयाणा आणि केरळ या राज्यांंनी 31 मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. महाराष्ट्रात शाळा, कॉलेजेससोबत मॉल्सही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत.

- एअर इंडियाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय विमानसेवा तसेच दुबई, मस्कत, दमम्म, दोहा, जेद्दाहच्या विमान सेवा 30 मे पर्यत स्थगित केल्या आहेत.

- इंडिगो एयरलाईन्सनेही उड्डाणे रद्द केली आहेत. 17 मार्च 2020 पासून दुबई, शारजाह व अबुधाबीची उड्डाणे रद्द करीत असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले.

- भारत-बांगलादेश दरम्यानची रेल्वे आणि बस सेवा 15 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहे.

- संयुक्त राष्ट्र संघाचा अधिकारी किंवा एखाद्या देशाच्या राजदुताला भारतात यायचं असल्यास त्याला अटारी-वाघा सीमेवरून प्रवेश देण्यात येईल. यावेळी करोनाची संपूर्ण तपासणी करून भारतात प्रवेश दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.

-भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमधून रस्तेमार्गे होणारी प्रवासी वाहतूक 15 मार्च मध्यरात्रीपासून, तर पाकिस्तान मधील सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक 16 मार्च मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-बहुतांश आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. अगदी आवश्यक त्याच ठिकाणी वाहतुकीला परवानगी दिली जाईल असे सांगण्यात आले आहे.

- आयपीएलच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यंदा 29 मार्च पासून हे सामने खेळवले जाणार होते.

दरम्यान,काल केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाला 4 लाख रुपये मदतनिधी देण्यात येणार आहेत. आतापर्यंत भारतात दोन नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, हे दोन्ही रुग्ण वयोवृद्ध होते.