पश्चिम बंगाल: भाजप नेत्याच्या मुलीचे अपहरण, संतापलेल्या जमावाकडून तृणमूल काँग्रेस आमदाराच्या वाहनावर दगडफेक
kidnapping | (Photo credit: archived, edited, representative image)

पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील भाजप नेते सुप्रभात बटियाबाल (BJP leader Suprabhat Batyabyal) यांच्या मुलीचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले आहे. बटियाबाल यांच्या पत्नीने लाभपूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीतही मुलीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आणि संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, लोकांच्या या संतापाचा जीवघेना सामना तृणमूल काँग्रेस आमदार मनीरूल इस्लाम (Trinamool Congress MLA Manirul Islam) यांनाही करावा लागला. संतप्त जमावाने मनीरुल इस्लाम यांच्या वाहनावर हल्ला केला. जमावाने इस्लाम यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इस्लाम यांनी घटनास्थलावरुन पळ काढत नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये आश्रय घेतल्याने त्यांच्यावरील धोका टळला. संतप्त जवानाने मनीरुल इस्लाम यांच्या वाहनाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली.

अपहरण प्रकरणामुळे संतप्त नागरिक मुलीचा तत्काळ शोध घ्यावा. तसेच, अपहरणकर्त्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करत आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुपारी तीनच्या सुमारास इंदास गवानजीक एका जमावाने आमदार मनीरुल इस्लाम प्रवास करत असलेले वाहन आडवले. त्यांच्या वाहनाला घेराव घातला आणि त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर आमदार मनीरुल इस्लाम यांना त्यांच्या सुरक्षारक्षाकासमवेत सुरक्षीत रवाना करण्यात आले. जमावाला पांगविण्यासाठी हलकासा लाठीमार करावा लागल्याचेही एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, आमदार मनीरुल इस्लाम हे मुलुीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. आमदारांनी सांगितले कीस, 'मी मुलीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच, मुलीचा शोध सुरु आहे. लवकरच तिला शोधण्यात येईल व अपहरणकर्त्यांना पकडण्यात येईल असा विश्वास त्यांना दिला', असे सांगितले.

दरम्यान, मुलीच्या अपहरणाबाबत मुलीच्या आईने पोलीसांत तक्रार गुरुवारी दाखल केली. त्यानंतर परिसरात अपहरणाच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. परिसरातील काही नागरिकांनी रस्ता रोके केला. काही ठिकाणी आंदोलने केली. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त पोलीस दलाला पाचारण करावे लागल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, डिजिटल फ्रॉड: भाजप खासदार शोभा करंदलाजे यांच्या सॅलरी अकाऊंटमधून 15 लाख रुपये गायब)

दरम्यान, या अपहरण प्रकरणात एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणा कोणा राजकीय व्यक्तीचा हात असल्याचे अद्याप तरी पुढे आले नसल्याचे एसपी श्याम सिंह यांनी माहिती देताना म्हटले आहे.