कर्नाटक राज्यातील भाजप खासदार (Member of Parliament from Karnataka) शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांच्या सॅलरी अकाऊंटसोबत डिजिट घोटाळा (Digital Fraud) घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खासदार शोभा करंदलाजे यांच्या सॅलरी अकाऊंटमधून (Salary Account) तब्बल 16 लाख रुपये गायब झाले आहेत. खा. करंदलाजे यांनी दिल्ली येथील नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्टेशनमध्ये (North Avenue police station in Delhi) तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत की हे प्रकरण कर्नाटक पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. खा. करंदलाजे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्या गेल्या आठवड्यात बँकेत गेल्या होत्या. त्यांनी त्यांचे पासबुक अपडेट केल्यानंतर त्यांच्या ध्यानात आले की, त्यांच्या खात्यातून 15.62 लाख रुपये गायब आहेत.
प्राप्त माहितीनुसार, खा. करंदलाजे यांच्या बँक खात्यातून अज्ञाताने (हॅकर) डिसेंबर 2018 मध्ये अनेक वेळा पैसे काढले आहेत. धक्कादायक असे की, मेसेज अलर्ट सुविधा कार्यरत असूनही बँक खात्यातून पैसे काढल्याचा एकही संदेश (मेसेज) खासदारांच्या मोबाईलवर आला नाही. करंदाले यांनी म्हटले आहे की, हे फारच विचित्र आणि धक्कादायक आहे. लोकप्रतिनिधींसोबत असे होत असेल तर, सर्वसामान्य नागरिकाबाबत काय होऊ शकेल. जर मी कोणताही आर्थिक प्रकारचा बँक व्यवहार या खात्यावरुन केला तर, माझ्या मोबाईलवर लगेच संदेश येतो. मात्र, या प्रकरणात माझ्या मोबाईलवर कोणताच संदेश आला नाही. दरम्यान, पोलीसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे ट्रान्स्फर केले आहे. (हेही वाचा, दहा रुपयांचे नाणे वैध! आरबीआयने 14 प्रकारच्या नाण्यांबाबत दिले स्पष्टीकरण)
पोलीस अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची पुष्टी करत म्हटले आहे की, नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. त्यांतर हे प्रकरण सायबर सेलकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी बँक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पुढील तपासही सुरु आहे. शोभा करंदलाजे या कर्नाटकातील भाजपच्या एक प्रमुख राजकीय नेत्या आहेत. त्या उडुपी चिकमंळूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करतात.