पुढील 24 तासांत देशातील अनेक राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस (Heavy Rain) होणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गाटपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाने बुधवारी महाराष्ट्रासह (Maharashtra Rain Alert) अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने ईशान्येकडील राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Rain Alert In India: देशभरातील 11 राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता- हवामान विभाग)
6 मार्च आणि 7 मार्चच्या रात्री पश्चिम हिमालयीन प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी पाहायला मिळेल. दिल्लीत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
दरम्यान राज्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून देखील अद्याप या नुकसानाची नोंद घेतली न गेल्याने शेतकरी संतप्त आहेत.