'वन्दे भारत' एक्स्प्रेसची बुकींग सुरु; IRCTC वरुन मिळवा कन्फर्म तिकीट
Vande Bharat Express (Photo Credit: Twitter)

आजपासून (15/2/2019) देशातील सर्वात वेगवान ट्रेन 'वन्दे भारत' एक्स्प्रेस (Vande Bharat Express) देशात धावू लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ट्रेनचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे बोर्डाचे इतर सदस्य यातून सफर करतील. भारताची सर्वाधिक वेगवान ट्रेनच्या तिकीट बुकींगला सुरुवात झाली आहे. वन्दे भारत ट्रेनची खासियत

आता रेल्वेने वन्दे भारत एक्स्प्रेसच्या तिकीट दरातही घट केली आहे. त्यामुळे दिल्ली ते वाराणसी हा वातानुकूलित प्रवास तुम्ही केवळ 1760 रूपये करु शकता. तर एक्झिक्युटीव्ह श्रेणीचे भाडे 3310 रूपये इतके आहे. परतीच्या प्रवासासाठी वातानुकूलित श्रेणीतील तिकीट दर 1700 रूपये आणि एक्झिक्युटीव्ह श्रेणीचे भाडे 3260 रूपये आहे. या तिकीट दरात खानपानाचाही समावेश आहे.

वन्दे भारत एक्स्प्रेसचे तिकीट बुक तुम्ही आयआरसीटीसी (IRCTC) च्या (www.irctc.co.in) वेबसाईटवरुन किंवा स्मार्टफोनवर रेल कनेक्ट (Rail Connect) अॅप इनस्टॉल करुन करु शकता. यावर अकाऊंट बनवून लॉग इन करा आणि त्यानंतर लगेचच तुम्ही तिकीट बुक करु शकता. 17 फेब्रुवारी आणि त्यानंतरच्या प्रवासासाठी सध्या तिकीट बुकींग सुरु आहे.

अलिकडेच देशातील सर्वात वेगवान ट्रेन 18 चे नाव बदलून 'वन्दे भारत' एक्स्प्रेस करण्यात आले होते. या ट्रेनची निर्मिती चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली असून त्यासाठी तब्बल 97 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.