नकारात्मक प्रतिक्रियांनंतर, वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिट दरांबाबत रेल्वे प्रशासनाचे विचारमंथन सुरु
Train 18 | | (Photo credit: ANI)

Vande Bharat Express ticket prices Updet: वंदे भारत एक्सप्रेस या गाडीच्या तिकिट दरांबाबत जनतेतून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर रेल्वे प्रशासन तिकिट दरांबाबत अवलोकन करणार आहे. रेल्वे सूत्रांचा हवाला देत पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार आता वंदे भारतचे तिकिट दर 1850 रुपयांवरुन कमी करुन ते आता 1710 रुपयांवर आणण्याची तयारी सुरु केली आहे. तर, एक्झिक्युटीव्ह क्लाससाठी  (Executive Class) असलेले दर 3520 रुपयांवरुन ते 3310 रुपयांवर आणण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, तिकीट दरांवरुन चर्चा होत असली तरी, बहुचर्चीत ठरलेली ही 'वंदे भारत ट्रेन' (Vande Bharat Express) अखेर प्रवासासाठी सज्ज झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 15 फेब्रुवारीला या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. सूत्रांनी सांगितले की, या ट्रेनमध्ये दोन श्रेणी-एक्झिक्युटीव्ह आणि चेअर कार आहेत. यात भोजनव्यवस्तेसाठी अतिरिक्त शूल्क आकाराण्यात येणार आहे. नवी दिल्ली ते वाराणसी जाणाऱ्या प्रवाशांना एक्झिक्युटीव्ह श्रेणीमध्ये सकाळचा नाश्ता आणि भोजनासाठी 399 रुपये द्यावे लागतील. तर, चेअर कारने प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना या प्रवासादरम्यान, 344 रुपये द्यावे लागतील. नवी दिल्ली ते कानपूर आणि प्रयागराज असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक्झिक्युटीव्ह क्लास आणि चेअर कारने प्रवासासाठी अनुक्रमे 155 रुपये आणि 122 रुपये इतके शुल्क द्यावे लागेल. वाराणसी ते नवी दिल्ली असा प्रवास करणाऱ्या एक्झिक्युटीव्ह क्लास आणि चेअर कारमध्ये अनुक्रमे 349 आणि 288 रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, तिकिट दरांवरुन नकारात्मक प्रतिक्रिया आल्याने तिकिट दरांमध्ये बदल संभवतो. हा बदल झाल्यास इतर सेवांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कांबाबतही फेरबदल होऊ शकतो. (हेही वाचा, वंदे भारत ट्रेन: 1,850 रुपयांत करा वाराणसी ते दिल्ली गारेगार प्रवास, एक्झिक्युटीव्ह क्लासला मोजावे लागणार 3,520 रुपये)

यापूर्वी प्रसिद्ध झालेल्य वृत्तानुसार, वंदे भारत ट्रेन या गाडीने वाराणसी ते दिल्ली (Varanasi to Delhi) असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 1,850 रुपये रुपये मोजावे लागणार होते. तर, एक्झिक्युटीव्ह क्लासला (Executive Class) याच प्रवासासाठी 3,520 रुपये मोजावे लागतील. या शुल्कामध्ये रेल्वेकडून मिळणारे भोजन आणि इतर खाद्यपेय सेवा याच शुल्कात समाविष्ट होता. तर, परतीच्या प्रवासासाठी आकारण्यात येणारे शुल्क हे 1,795 रुपये असेल. तर, एक्झिक्युटीव्ह क्लासला(Executive Class) हे शुल्क 3,470 रुपये इतके असेल, असे सांगण्यात येत होते. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इतक्या दीर्घ पल्ल्याच्या शताब्दी गाड्यांच्या तुलनेत या गाडीचे प्रवाशी शुल्क 1.5 पटीने अधिक आहे. तसेच, प्रीमियम ट्रेनमध्ये प्रथम श्रेणी वातानुकूलित शुक्लापेक्षा एक्झिक्युटीव्ह क्लासचे प्रवाशी शुक्ल 1.4 पटीने अधिक असल्याचे म्हटले होते.