उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावानंतर आपल्या मुलीचे मुस्लिम पुरुषाशी ठरवलेले लग्न मोडले आहे. हे लग्न 28 मे रोजी होणार होते. पौरी नगरपालिकेचे अध्यक्ष यशपाल बेनम यांनी आपल्या मुलीचे लग्न मुस्लिम पुरुषाशी केल्यामुळे जनतेतून टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न रद्द केले आहे. पीटीआयने या संदर्भातली बातमी दिली आहे.
या लग्नाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. यानंतर बेनम यांच्यावर भाजपचे समर्थक आणि विरोधक दोघांनीही टीका केली. यशपाल बेनम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी आपल्या मुलीच्या आनंदासाठी मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याचा विचार केला.परंतु सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रस्तावित लग्नाला ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या, त्या पाहता ते पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता मला जनतेचा आवाजही ऐकावा लागेल, असे देखील बेनम म्हणाले.
पौडी शहरात 28 मे रोजी होणारा विवाह आता रद्द करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. भाजप नेता बेनम यांच्या मुलीने मुस्लिमाशी लग्न केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी येथील झांडा चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. विहिंप, भैरव सेना आणि बजरंग दल या आंदोलनात सहभागी झाले होते.अशा लग्नाला आमचा तीव्र विरोध आहे, असे विहिंपचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक गौड यांनी सांगितले.