उत्तर प्रदेशच्या राजकारणात (Uttar Pradesh Politics) आता जोरदार रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका पाहता राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी ( Samajwadi Party) पक्षानेही आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची सायकल पुन्हा एकदा वेगाने धावण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे काका आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे बंधू शिवपाल यादव ( Shivpal Yadav) यांनी आपण आपला प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहिया (PSPL) पक्ष समाजवादी पक्षात (SP) विलीन करण्याची तयारी दर्शवली आहे. असे घडल्यास अखिलेश यादव यांची उत्तर प्रदेशमधील ताकद वाढणार आहे.
अखिलेश यादव यांच्यासोबत वाद झाल्यानंतर शिवपाल यादव यांनी समाजवादी पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहिया (पीएसपीएल) पक्षाची स्थापना केली. तसेच विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवल्या. त्याचा बराच फटका अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षास बसला. मात्र, ते समाजवादी पक्षाचा प्रभाव कमी करु शकले नाहीत. विशेष म्हणजे मुलायमसिंह यादव यांचाही पाठिंबा मिळविण्यात शिवपाल यशस्वी होते. दरम्यान, आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवपाल यादव यांना घरवापसी खुणावत आहे. त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. (हेही वाचा, Akhilesh Yadav On Alliance: समाजवादी पार्टी कोणासोबत करणार आघाडी? अखिलेश यादव यांचे स्पष्ट संकेत)
शिवपाल यादव यांनी अलीगढ येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जर केवळ मलाच नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांनाही सन्मान दिला जाणार असेल तर आपण आपला प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहिया (पीएसपीएल) पक्ष समाजवादी पक्षात विलीन करण्यास तयार आहोत. आपली अट मान्य असेल तरच आपण पक्ष विलीकरणाबाबत विचार करु असे शिवपाल यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, आपण समाजवादी पक्षात होतो तेव्हा पक्ष तळागाळात जाऊन काम करत असे. आता केवळ कार्यालयातून काम करतो.
दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, त्यांचा काका शिवपाल यांच्याशी कोणताही वाद नाही. ते पक्षात आले तर स्वागत आहे. त्यांना आदराचे स्थान मिळेल.