Uttar Pradesh: एका व्यक्तीला 5 मिनिटांच्या अंतराने दिले कोविड-19 लसीचे दोन्ही डोस
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

कोविड-19 लसीकरणात (Covid-19 Vaccination) निष्काळजीपणा झाल्याची एक घटना समोर येत आहे. नर्सेसच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीला कोविड-19 लसीचे दोन्ही डोसेस 5 मिनिटांचया अंतराने देण्यात आले. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ललितपुर (Lalitpur) जिल्ह्यातील ही घटना आहे. रावरपुरा (Ravarpura) येथील कोविड लसीकरण केंद्रात हा प्रकार घडला. रिपोर्टनुसार, बुधवारी या लसीकरण केंद्रावर लस घ्यायला गेलेल्या एका व्यक्तीला अवघ्या 5 मिनिटांत लसींचे दोन्ही डोस मिळाले. लसीकरण करताना नर्सेस बोलण्यात व्यग्र असल्याने हा गोंधळ झाला.

लस घेतलेल्या व्यक्तीने सांगितले की, लसीच्या दोन डोसमध्ये ठराविक काळाचे अंतर आहे, याची मला कल्पना नव्हती. लस घेऊन घरी गेल्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागले. त्याने लसीकरण केंद्रावर झालेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर दोन्ही डोस घेतल्याचे लक्षात आले.

यानंतर त्याने चीफ मेडिकल ऑफिसरची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आणि लस घेतलेल्या व्यक्तीला इमरजन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, CMO ने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीवर कोणताही त्रास न झाल्याचेही त्यांनी सांगितले. (काय सांगता? Covid-19 लसीचा डोस घेतल्यावर अंगाला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा; Nashik मध्ये चर्चेला उधाण)

दरम्यान, देशात 16 जानेवारीपासून लसीकरणला सुरुवात झाली. आतापर्यंत 23,90,58,360 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून डिसेंबर 2021 पूर्वी सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी कोवॅक्सिन, कोविशिल्ड लसींच्या जोडीला इतर लसींना लसीकरण मोहिमेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.