Ram Mandir | Twitter/ANI

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये भगवान श्रीरामाच्या मंदिर उभारणीचं काम जोरात सुरू आहे. राम मंदिराचं काम 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील चबुतर्‍याचं काम पूर्ण झालं आहे. आज राम मंदिराच्या गर्भगृहाचा शिलान्यास करत दुसर्‍या टप्प्यातील काम सुरू झालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी राम मंदिराच्या गर्भगृहाची आधारशिला ठेवली आहे. यावेळी वैदिक मंत्रोच्चारण करण्यात आले सोबतच विधिवत पूजा देखील झाली.

राम मंदिराच्या गर्भगृहाच्या शिलान्यास कार्यक्रमाला सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासोबत काही मंत्री, नेतेमंडळी उपस्थित होते. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास चे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, महामंत्री चंपत राय सोबत 250 साधु संत उपस्थित होते. डिसेंबर 2023 पर्यंत गर्भगृहाचं काम पूर्ण होणार आहे. यानंतर 2024 च्या मकरसंक्रांती दिवशी रामलल्लाला मंदिरामध्ये स्थापित केले जाणार आहे. नक्की वाचा:  Ram Mandir Construction: अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टला मिळाली सुमारे 100 कोटींची देणगी; 2024 पूर्वी पूर्ण होणार बांधकाम.

(हेही वाचा - राम मंदिर- बाबरी मशीद वादाचा काय होता इतिहास? जाणून घ्या सविस्तर)

राम मंदिरच्या बाजूने 9 नोव्हेंबर 2019 ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला होता. यानंतर 5 ऑगस्ट 2020 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरासाठी शिलान्यास केला होता. त्यानंतर वेगात कामाला सुरूवात झाली आहे. सध्या राम मंदिराच्या निर्माणासाठी गुलाबी रंगाच्या दगडांचा वापर केला जात आहे. हे दगड राजस्थानच्या भरतपूर जवळील बंसी मधून काढले जात आहेत. यावर नाहर शैलीत कलाकृती बनवण्याचं काम सुरू आहे.