Baby (File Image)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शामली (Shamli) येथे दोन नवजात बालकांच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. शामली जिल्ह्यातील कैराना येथे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दोन नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी खोलीतील एसी (AC) चालू ठेवण्याने थंडीमुळे या बाळांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर या खाजगी दवाखान्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉक्टरला ताब्यात घेतले आणि सीएमओलाही या प्रकरणाची माहिती दिली.

अहवालानुसार, बासेडा गावातील रहिवासी नजीम यांची पत्नी तस्मिना हिने शासकीय रुग्णालयात मुलाला जन्म दिला. नाजीमची आई रुखसाना हिने सांगितले की, मुलाच्या जन्मनंतर रात्री हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या नर्सने मुलाची तब्येत बिघडत असल्याचे सांगून जवळच्या देव क्लिनिकच्या डॉक्टर नीतू यांना फोन केला.

डॉक्टर नीतूने मुलाला तपासले आणि 72 तास मशीनमध्ये ठेवावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मुलाला देव क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्याचवेळी आर्या पुरी येथील रहिवासी ताहीर यांच्या पत्नीने शनिवारी दुपारी बारा वाजता शासकीय रुग्णालयात मुलाला जन्म दिला. ताहीरदेखील आपल्या नवजात मुलाला दाखवण्यासाठी देव क्लिनिकमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी त्यालाही 72 तास मशीनमध्ये ठेवण्याचा सल्लाही दिला आणि मुलाला दाखल करून घेतले.

त्यानंतर रविवारी पहाटे पाच वाजता दोन्ही मुले मृतावस्थेत असल्याचे कुटुंबीयांना आढळून आले. यानंतर दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला. डॉक्टर हवाबंद असलेल्या खोलीत एसी लावून झोपले, त्यामुळे थंडीमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रभारी कोतवालीचे प्रभारी निरीक्षक नेत्रपाल सिंह पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी डॉक्टरला ताब्यात घेतले. (हेही वाचा: MP: रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने रूग्णवाहिका अडकली; गरोदर महिलेने रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म)

नेत्रपाल सिंह यांनी मुलांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सांगितले की, नीतूविरुद्ध आयपीसीच्या कलम 304 (दोषी हत्येची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, हे क्लिनिक गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे.